तोंडापूर धरणातून दिवसाढवळ्या शेतकऱ्यांकडून पाणी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 18:29 IST2018-05-20T18:29:12+5:302018-05-20T18:29:12+5:30
जामनेर तालुक्यातील तोंडापूर धरणाच्या भिंतीला भगदाड पाडून पिकांना पाणी देण्याचा उद्योग काही शेतकºयांनी सुरू केला असून अधिकारी, कर्मचाºयांनी मात्र डोळ्यांवर कातडे पांघरले आहे. याबाबत संताप व्यक्त होत आहे.

तोंडापूर धरणातून दिवसाढवळ्या शेतकऱ्यांकडून पाणी चोरी
लोकमत आॅनलाईन
तोंडापूर ता. जामनेर, दि.२० : मे महिन्यातील कडक ऊन आणि त्यात तीव्र पाणी टंचाईची समस्या संपूर्ण जिल्ह्यात भेडसावत आहे. पाण्यासाठी शहरी आणि ग्रामीण जनता वणवण भटकत आहे, अशा कठीण वातावरणात तोंडापूर येथील काही शेतकºयांना मात्र आपली पिके वाचविण्याची फिकीर पडली आहे. त्यासाठी त्यांनी तोंडापूर धरणाच्या भिंतीला भगदाड पाडून पाणी चोरण्याचा संतापजनक प्रकार निदर्शनास आला आहे. तथापि धरणावरील अधिकारी आणि कर्मचाºयांनी याबाबत डोळ्यांवर कातडे पांघरल्यामुळे बिनबोभाट हा गोरखधंदा सुरु आहे.
तोंडापूर तेथील मध्यम प्रकल्पात सद्या मृतसाठा सोडून केवळ नऊच टक्के जलसाठा शिल्लक असतांना दहा ते पंधरा शेतकºयांकडून पाईपलाईन टाकून धरणातून पाणी उचलून त्याचा वापर शेतीसाठी सुरू केला आहे. धरणाच्या पाण्यात विद्युत पंप (पाणबुडी) बसवून आणि कोणाच्याही नजरेस पडू नये म्हणून पाईप व वायर जमीनीत गाडून पाणी चोरण्यासाठी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तथापि राजरोसपणे सुरू असलेल्या या पाणी चोरीकडे शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.
अजिंठा लेणीसाठी याच धरणातून राखीव असलेल्या साठ्यातून पाण्याचा पुरवठा केला जातो. तर तोंडापूर गावात सद्या पाण्याची भीषण समस्या असतांना गावातीलच दहा ते पंधरा शेतकºयांनी धरणाची सहजासहजी नजरेस येणार नाही, अशा ठिकाणी भिंत फोडून पाईपलाईन केल्याचे निदर्शनास आले.
पगारी कर्मचाºयांकडून दूर्लक्ष
शासनाने या धरणाच्या निगराणीसाठी तीन कर्मचाºयांना पगारी नियुक्त केले असले तरी हे कर्मचारी धरणाकडे फिरकूनही पाहत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या पाणी चोरीबाबत सिंचन विभागाचे कर्मचारी शंकर निकम यांच्याशी संपर्क साधला असता शेतकºयाने फक्त पाइपलाईन धरणात नेली आहे. त्याने मोटार बसविल्यास कारवाई करु असे सांगून जुन्या शेतकºयांना परवानगी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
म्हणे कारवाई करू, पण केव्हा...?
सिंचन शाखेचे अधिकारी चौधरी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, नविन पाईपलाईन टाकणाºयांना आम्ही नोटीस दिली आहे. त्यांनी वेळेत पाइप न काढल्यास आम्ही स्वत: काढून फेकू. तसेच जुन्या विद्युत पंपाचे पंचनामे केले असून शेतकºयांनी ते वेळेत न काढल्यास विद्युत पंपदेखील जप्त केले जातील. याबाबत तोंडापूरचे सरपंच प्रकाश सपकाळ यांना दोनवेळा फोनवर संपर्क केला असता त्यांनी फोनच उचलला नाही.