जळगाव : चोरी करताना चोरटे काय क्लृप्त्या वापरतील याचा नेमच राहिलेला नाही. चोरी करताना पकडले जाऊ नये तसेच बिनधास्तपणे संपूर्ण घरातील वस्तू शोधता यावे यासाठी चोरट्यांनी तांबापुरात ज्या घरात चोरी करायची ते कुटुंब ज्या खोलीत झोपले, त्याच्यासह शेजारच्या घरांच्याही बाहेरुन कड्या लावून सरफराज खान अयुब खान यांच्या घरातून रोकड, दागिने मिळून दीड लाख रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
सरफराज खान हे तांबापुरा परिसरातील फुकटपुरा भागात कुटुंबीयासह वास्तव्यास आहेत. मुलगा वाहनचालक असल्याने तो बाहेरगावी गेला होता त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांनी खाली घराला कुलूप लावून वरच्या मजल्यावर झोपायला गेले. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी खान झोपलेल्या खोलीला तसेच शेजारील घरांना बाहेरुन कड्या लावल्या. खान यांच्या घराचा कडीकोयंडा तोडत कपाटामधून १५ ग्रॅम सोन्याची पोत, चांदीचे कडे, चांदीची पोत, चांदीची अंगठी, १२ हजार रोख असा दीड लाखांचा ऐवज लांबविला. मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सरफराज खान हे उठले असता दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी शेजा-यांशी संपर्क साधला. त्यांनीही दरवाजा उघडत नसल्याने आणखी इतर काही नागरिकांना संपर्क करून बोलावले, त्यानंतर सर्वच घरांच्या कड्या उघडण्यात आल्या. खान कुटुंबीय खाली आले असता दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला तर घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरीची खात्री झाल्यावर सरफराज खान यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.