आगामी दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST2021-08-18T04:21:50+5:302021-08-18T04:21:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बंगालच्या उपसागरापासून ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा पावसाला ...

आगामी दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बंगालच्या उपसागरापासून ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे, तसेच यामुळे आगामी दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त हवेमुळे हा पट्टा निर्माण झाला असून, त्याचा जोर आगामी तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाऊस बऱ्यापैकी होण्याचाही अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस हा अरबी समुद्राकडून येणाऱ्या ढगांमुळे होत असतो; मात्र सुरुवातीला अरबी समुद्राकडून येणारी हवेची दिशा थेट उत्तर महाराष्ट्राकडे न सरकत ती गुजरात व मध्यप्रदेशकडे सरकल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. त्यात ऑगस्ट महिन्यात पावसाची सरासरी वाढेल, अशी शक्यता असतानाही जून व जुलैच्या तुलनेतदेखील ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस झाला आहे.
अरबी समु्द्रातील पाऊस सक्रिय झाल्यानंतरच जोर वाढणार
जिल्ह्यात सोमवारपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी हा पाऊस बंगालच्या उपसागराकडील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सुरू झाला आहे. या पावसाचा जोर तीन ते चार दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा पावसाचा खंड पडण्याचीही शक्यता आहे. बंगालचा उपसागरातील पाऊस पुन्हा ॲक्टिव्ह होण्याची गरज असून, हा पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यानंतरच सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो.
पावसामुळे केळी, कापसाला फायदा
सोमवारपासून जिल्ह्यातील चोपडा, भुसावळ, जळगाव, पाचोरा, जामनेर या तालुक्यात पावसाला सुरुवात झाली असून, मंगळवारीदेखील जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाऊस झाला आहे. या पावसामुळे उडीद, मुगाला फारसा फायदा झाला नसला तरी कोरडवाहू कापूस व केळीला काही अंशी फायदा झाला आहे. यासह मका, सोयाबीनलादेखील या पावसामुळे काही प्रमाणात फायदा होणार आहे.
कोट...
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. मान्सूनचा कालावधी हा सप्टेंबरपर्यंत राहतो. अरबी समुद्रातील पाऊस सक्रिय झाला नाही तर परतीच्या पावसाला लवकरच सुरुवात होऊ शकते.
-रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ