लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या ४ लाख २२ हजार ४०३ लाभार्थी विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा संपणार आहे. त्यांना लवकरच मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार असून नाशिक विभागाकडून ९६ टक्के पाठ्यपुस्तकांचे तालुकास्तरावर वितरण झाले आहे. मात्र, दुसरीकडे विद्यार्थ्यांना गणवेशाचीही प्रतीक्षासुद्धा लागून आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्हा परिषद, नगर परिषद, शासकीय, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित, समाजकल्याण अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो. यंदा शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी जिल्ह्यातील ४ लाख २२ हजार ४०३ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप केले जाणार आहेत. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले जाते; परंतु सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या, तर पुस्तक छपाईला सुद्धा उशीर झाला. शाळा उघडून दोन महिना उलटले; पण विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके मिळालेली नाही.
२५ लाख ५१ हजार २३० प्रतींची मागणी
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने यंदा २५ लाख ५१ हजार २३० प्रतींची मागणी नाशिक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार विभागाकडून वितरण प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. २४ लाख ४७ हजार १९ पाठ्यपुुस्तकांच्या प्रती शिक्षण विभागाला आतापर्यंत प्राप्त झाल्या असून त्या तालुकास्तरावर वितरण करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विभागाकडून ९६ टक्के पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. १ लाख ४ हजार २११ पाठ्यपुस्तकांचे वितरणही होणे बाकी आहे.
पुरवठा प्रतींची संख्या
तालुका - पुरवठा प्रतींची संख्या
अमळनेर - १८३१५६
भडगाव - १०९२०४
भुसावळ - १६५०६०
बोदवड - ५९४४२
चाळीसगाव - ३२३४४६
चोपडा - १७८३०७
धरणगाव - १०९६७५
एरंडोल - ११५३४९
जळगाव -११८८३१
जामनेर - २८०८७८
मुक्ताईनगर - १०५५३७
पाचोरा - २०३२६६
पारोळा - १३६३४२
रावेर - १९५०३८
यावल - १७३४८८