पंढरपूरचा विठ्ठल आषाढी एकादशीला पिंपळगावला येतो..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:13 IST2021-07-20T04:13:00+5:302021-07-20T04:13:00+5:30
पिंपळगाव (हरे.), ता. पाचोरा : बहुळा नदीच्या तीरावर वसलेले पिंपळगाव हरेश्वर संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेले गाव आहे. येथे ...

पंढरपूरचा विठ्ठल आषाढी एकादशीला पिंपळगावला येतो..
पिंपळगाव (हरे.), ता. पाचोरा : बहुळा नदीच्या तीरावर वसलेले पिंपळगाव हरेश्वर संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेले गाव आहे. येथे श्री समर्थ गोविंद महाराज मंदिर, विठ्ठल मंदिर, हरिहरेश्वराचे मंदिर असल्याने गावाची एक वेगळी ओळख परिसरात व संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली आहे.
पिंपळगाव हरेश्वर या गावाला प्रतिपंढरपूर मानतात, कारण भक्त विठ्ठल आषाढीदिनी समर्थ गोविंद महाराज यांना भेटायला येतात. ‘विठू सोडून येत असे पंढरीला असा भक्त माझा बहुळा तीराला श्री गोविंद अवतार झाला’ अशी आख्यायिका ऐकायला मिळते. त्यामुळे पिंपळगाव येथे यात्रेत भाविकांची मोठी गर्दी असते. गोविंद महाराजांचा जन्म संत तुकाराम महाराजांचे अपूर्ण २०० अभंग पूर्ण करण्यासाठी इ.स. १७८५ मध्ये उत्राण (ता. पाचोरा) येथे झाला.
८ व्या वर्षापासून गोविंद महाराज पंढरपूरची वारी पायी करू लागले. वयाच्या १० व्या वर्षी ते पंढरपूरला गेले. चेंगराचेंगरीत एक महिला मरण पावली. तिला जिवंत करण्यासाठी गोविंद महाराजांनी भक्त विठ्ठलाला साकडे घातले. अखेर ती महिला जिवंत झाली. मात्र, त्याचवेळी विठ्ठलाने गोविंद महाराज यांना सांगितले. यापुढे तू पंढरपूरला यायचे नाहीस, मी पिंपळगावला दर आषाढी एकादशीला तुला दुपारी १२ वाजता भेटायला येईल, तेव्हापासून दर आषाढी एकादशीला विठ्ठल पिंपळगावला येतात, असा समज असल्याने अनेक भक्त माध्यान्ह आरतीला हजेरी लावतात व समाधीचे भक्तिभावाने दर्शन घेतात.
महाराजांचे कार्य
महाराजांचा जीवनकाळ १७८५ ते १८२५ असा ४० वर्षांचा आहे. त्यात त्यांनी पिंपळगाव येथे पोळा सण, रथोत्सव, काकडा आरती, कोथळी येथे मुक्ताईची मूर्ती स्थापन केली. पाळधी, उत्राण, जामनेर येथे विठ्ठलाचे देवालय उभारले.
उडीचे लोटांगण भजन
पांडुरंगाने दिलेले टाळ, माळ, पगडी परिधान केल्यावर महाराज उडीचे लोटांगणी भजन करतात, तेव्हा भाविकांची खूप गर्दी असते.
भक्तांसाठी सोयीसुविधा
पाचोरा-जामनेर आगारातून दोन दिवस जादा बस सोडण्यात येतात. एक दिवस अगोदर येणाऱ्या भाविकांची भोजन, निवास, कीर्तनाची सुविधा असते. पोलीस, स्काउट गाइड विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते गर्दी नियंत्रणासाठी मदत करतात. एकादशीला गावात ठिकठिकाणी मोफत चहा-फराळाची सोय असते.
बहुळा नदीच्या किनारी सुमारे ६ एकर क्षेत्रात समाधी मंदिर आहे. मंदिरात ६५ चौक्या, ६५ खांब, ६५ कळस, रचलेल्या भोपाळी ६५, अध्याय मंदिराची जागा ६५ बाय ६५ आहे. मुख्य समाधी मंदिरात विठ्ठल व रुक्मिणीची मूर्ती आहे. देवालयाच्या पूर्वेला २ सभागृह आहेत. असे मंदिर पिंपळगाव हरेश्वर येथे असूनदेखील गावातील व परिसरातील भाविकांना कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने दर्शन घेता येत नसल्याने ग्रामस्थांनी देवाला साकडे घातले आहे की, हे देवा आता तरी आलेल्या या संकटाचे निवारण कर व पुढच्या वर्षी तरी लाखोंच्या संख्येने भाविकांना दर्शन घेऊ दे.
190721\19jal_5_19072021_12.jpg
पंढरपूरचा विठ्ठल आषाढी एकादशीला पिंपळगावला येतो..