नियमाचे उल्लंघन, ७१ लाख दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST2021-07-02T04:13:17+5:302021-07-02T04:13:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि पालिका प्रशासनाची कोरोनासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक ...

नियमाचे उल्लंघन, ७१ लाख दंड वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि पालिका प्रशासनाची कोरोनासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. जानेवारी ते जून या सहा महिन्यांदरम्यान शहरात वाहतूक पोलिसांनी नियम न पाळणाऱ्या सुमारे ३२ हजार वाहनचालकांवर कारवाई करून तब्बल ७१ लाख ८३ हजारांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये ट्रिपल सीट जाणारे वाहनधारक तसेच कागदपत्रे नसणारी वाहने, परवाना नसणारे चालक आणि तोंडाला मास्क न लावणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.
नियमित कारवाया झाल्या नाहीत
विशेष म्हणजे या वर्षात दीड महिने लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर वाहने धावली नव्हती. त्यामुळे वाहतूक शाखेच्या नियमित कारवाया झाल्या नाहीत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न बांधणाऱ्या व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्याची कारवाई वाहतूक शाखेकडून करण्यात आली होती.
मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ
शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून, काही बेशिस्त वाहतूक दिसून येते. यावर उपाय म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी बेशिस्त वाहनचालकांविरुध्द मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत जानेवारी ते जून २०२१ दरम्यान ३२ हजार ९०५ केसेसमधून ७१ लाख ८३ हजार २०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच ६ लाख ९,५०० रुपये थकीत दंड वसूल करण्यात आला आहे.
अल्पवयीनवर करडी नजर
कोरोना काळात पालकांना न जुमानता अल्पवयीन मुले खुशाल दुचाकी वाहने वाहतुकीचे नियम मोडून चालताना दिसत आहे. अशांवर पोलिसांची करडी नजर आहे. पालकांनी अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहने देऊ नयेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
अशी झाली कारवाई
१. रहादारीस अडथळा निर्माण करणे - २५० केसेस
२. वाहन चालविण्याचा परवाना जवळ न बाळगणे- १३,१३९ केसेस
३. ट्रिपल शिट वाहन चालविणे - १०५३ केसेस
४. फ्रंट सिट बसविणे - ८९ केसेस
५. वाहन चालविताना मोबाइल फोनवर बोलणे - ६०२
६. वाहनास नंबर न टाकणे/फॅन्सी नंबर प्लॅट- ७८६
७. विनाहेल्मेट - १३७२
८. विनागणवेश - १४०५
९. सिट बेल्ट न लावणे - ७३४
१०. इतर मोटार वाहतूक कायद्यान्वये- १३४७५ केसेस
एकूण ३२, ९०५ केसेस
यातून ७१ लाख ८३ हजार २०० रुपये दंड आकारण्यात आलेला आहे.