ढेकू गावच्या ग्रामस्थांचा दारूबंदीसाठी पोलीस स्टेशनवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST2021-07-01T04:13:44+5:302021-07-01T04:13:44+5:30
अमळनेर : तालुक्यातील ढेकू येथे २० वर्षांपासून दारूबंदी होती; मात्र गेल्या वर्षांपासून दारू विक्री सुरू झाल्याने दारूबंदीसाठी गावातील ...

ढेकू गावच्या ग्रामस्थांचा दारूबंदीसाठी पोलीस स्टेशनवर मोर्चा
अमळनेर : तालुक्यातील ढेकू येथे २० वर्षांपासून दारूबंदी होती; मात्र गेल्या वर्षांपासून दारू विक्री सुरू झाल्याने दारूबंदीसाठी गावातील महिला व पुरुषांनी अमळनेर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून दारूबंदी न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.
गेल्या २० वर्षांपासून ढेकू गावात दारूबंदी होती; मात्र गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात पुनश्च दारूविक्री सुरू झाल्याने पुरुष दारूच्या आहारी गेले. तरुण मुलेदेखील दारूच्या आहारी गेले आहेत. पुरुष दारू पिण्यासाठी महिलांना मारझोड करतात आणि पैसे हिसकावून नेतात तर १४-१५ वर्षांची मुलेदेखील चोरून लपून दारू पित असल्याने त्यांच्या भवितव्यास धोका निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायतीनेदेखील ग्रामसभा बोलावून दारूबंदीचा ठराव केला आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या; मात्र दारू विक्रेत्यांनी बाहेरून दारू आणून विक्री सुरू केली आहे.
बुधवारी सायंकाळी सुभाष पाटील, अरुण पाटील, दगाजी पाटील, अनिल पाटील, विश्वास पाटील, भीमराव पाटील, ज्ञानेश्वर ठाकरे, रवींद्र पाटील, जितेंद्र सोनवणे, उत्तमराव पाटील, मोहित पाटील, गौरव पाटील, संजय पाटील, मनीषा पाटील, रमाबाई रामोशी, आशाबाई मैराळे, देवकाबाई पाटील, उषाबाई मैराळे, मनीषा मैराळे, मालती पाटील, दुर्गा पाटील, ऋतुजा पाटील, सरला पाटील, सुधा पाटील, शालू पाटील, कल्पना पाटील, दगुबाई रामदास, सुवर्णा पाटील, मनीषा पाटील, दमोताबाई म्हस्के आदींनी पोलीस स्टेशनला मोर्चा काढून आपली व्यथा मांडली.
दारूबंदी न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ याना निवेदन देण्यात आले.
चौकट
महिला वैतागल्या
कोरोना सुरू झाल्यापासून दारूविक्रीला पुन्हा सुरुवात झाली. पोलिसांची यंत्रणा लाॅकडाऊनच्या अंमलबजावणीकडे लावण्यात आली होती. त्यामुळे दारूविक्रेत्यांवर कुणाचाच वचक राहिला नाही. ग्रामसभेने ठराव करूनही दारूविक्री सुरूच राहिली. अखेरीस आता महिलांनी दारूबंदी करायचीच, असा चंग बांधला असून त्यामुळे महिला पोलीस स्थानकावर धडकल्या. यावेळी अनेक महिलांनी आक्रमकपणे मते मांडली. कोणत्याही परिस्थितीत गावात दारूबंदी झालीच पाहिजे, असा आग्रह महिलांनी धरला.
===Photopath===
300621\30jal_11_30062021_12.jpg
===Caption===
ढेकू येथील ग्रामस्थ अमळनेर पोलीस स्टेशनला मोर्चा घेऊन आले होते छाया अंबिका फोटो