भालोद येथे आमदारांच्या शिक्षण संस्थेतून पोषण आहाराचा तांदूळ बाहेर जाताना सतर्क तरुणांनी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:52 IST2018-11-03T00:50:33+5:302018-11-03T00:52:07+5:30
आमदार हरिभाऊ जावळे अध्यक्ष असलेल्या सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून शुक्रवारी सायंकाळी पोषण आहाराच्या तांदळाने भरलेली रिक्षा (एमएच-१९-एएक्स-९८१०) द्वारे बाहेर नेत असताना गावातील सतर्क तरूणांनी ती पकडली असल्याने ही घटना उघड झाली आहे.

भालोद येथे आमदारांच्या शिक्षण संस्थेतून पोषण आहाराचा तांदूळ बाहेर जाताना सतर्क तरुणांनी पकडला
यावल/भालोद, जि.जळगाव : जिल्ह्यात पोषण आहाराचा विषय गाजत असताना पुन्हा विद्यार्थ्यांच्या तोंडचा संभाव्य घास हिसकावणारी घटना भालोद येथे उघडकीस आली. आमदार हरिभाऊ जावळे अध्यक्ष असलेल्या सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून शुक्रवारी सायंकाळी पोषण आहाराच्या तांदळाने भरलेली रिक्षा (एमएच-१९-एएक्स-९८१०) द्वारे बाहेर नेत असताना गावातील सतर्क तरूणांनी ती पकडली असल्याने ही घटना उघड झाली आहे.
याबाबत वृत्त असे की, आमदार हरिभाऊ जावळे अध्यक्ष असलेल्या भालोद येथील सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून शुक्रवारी तांदळाने भरलेली रिक्षा बाहेर जात होती. तेव्हा गावातील गौरव भालेराव, राहुल भालेराव, भरत भालेराव व शाळेसमोर बसलेल्या काही जणांनी आहाराचा तांदूळ घेऊन निघणारी रिक्षा पकडली. या रिक्षामध्ये सुमारे तीन क्विंटल तांदळाच्या सहा गोण्या होत्या.
तरूणांनी ही माहिती यावलचे गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांना दिली. सपकाळे यांनी तातडीने गटशिक्षणाधिकारी एजाज शेख यांना सांगितले. तेव्हा शेख व पोषण आहार अधिकारी गणेश शिवदे, शिक्षण विस्तार अधिकारी नईम शेख, केद्रप्रमुख तायडे यांनी घटनास्थळी भेट दिली. संस्थेच्या प्राथमिक व हायस्कूलच्या पोषण आहाराच्या गोदामातील रेकॉर्डनुसार मालाची तपासणी केली. ही तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोषण आहाराचा तांदूळ घेऊन जात असलेल्या रिक्षाचे काही नागरिकांनी चित्रीकरण करत सोशल मीडियावर व्हायरल केल्याने यावल तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.
दरम्यान, हा तांदूळ कुठे व कुणाकडे जात होता, याचीही चौकशी करणे गरजेचे आहे.
घटनास्थळी पो.कॉं. विकास कोल्हे व सुरेश तायडे तत्काळ दाखल झाले. याबाबत गटशिक्षणाधिकारी यांना गुन्हा दाखल करणार का विचारले असता त्यांनी सांगितले की, ज्यांनी तांदूळ पकडून दिला त्यांनी फिर्याद द्यायला पाहिजे, असे बोलून विषय टाळला. मात्र यात कोण अधिकारी, शिक्षक आहे? याची चर्चा गावात सुरू होती. याबाबत गुन्हा दाखल होतो की नाही याकडे तालुकावासीयाचे लक्ष लागून आहे. रात्री उशिरापर्यंत गावातील नागरिकांची शाळेसमोर गर्दी होती.