वीर गोगादेव महाराज जन्मोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST2021-07-24T04:11:53+5:302021-07-24T04:11:53+5:30
लेखक : प्रा. डॉ. मनीष करंजे, पारोळा मेहतर समाजाचे वीर गोगादेव महाराज हे त्यांचे आराध्य दैवत. त्यांचा ...

वीर गोगादेव महाराज जन्मोत्सव
लेखक : प्रा. डॉ. मनीष करंजे, पारोळा
मेहतर समाजाचे वीर गोगादेव महाराज हे त्यांचे आराध्य दैवत. त्यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा उत्सव आषाढ गुरुपौर्णिमेपासून सुरू होतो. गुरुपौर्णिमेला छडीची स्थापना केली जाते. छडी म्हणजे बांबूची मोठी काठी असते तिला तोरणे लावून कपडाने सजवलेले असते.
छडीलाच परमेश्वराचे स्वरूप दिलेले असते. छडी सव्वा महिना बसवतात. छडीच्या सेवेसाठी 'भगत' असतो छडीची रोज सकाळ, संध्याकाळ पूजा अर्चा करतात, धूप दीप नैवेद्य दाखवितात. छडीचा भगत रोज एक वेळेस जेवण करतो. छडीची मिरवणूक काढतात. जे भक्त छडी आपल्या खांद्यावर अथवा पोटाला रुमाल बांधून चालतात ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करतात त्या भक्तास घोडा अशी संज्ञा दिली जाते. असे एका छडीसोबत २५ ते ३० तरुण म्हणून असतात.
अंमळनेरात मेहतर समाजात एकूण पाच छडीची स्थापना केली जाते. छडी पुढील भक्तांकडे असते महर्षी स्वामी नवल नगर-गांधली पुरामध्ये ३ छड्या बसवल्या जातात. झामी चौक रामदेवजी बाबा
१) जगन जेधे भगत
२) पप्पूजी कलोसे. - भगत
३) बजरंगी अटवाल- भगत श्रीराम मंदिर गांधीपुरा
४) सुनील चिरावंडे -भगत
५) नारायण कलोसे भगत
याठिकाणी छड्या मोठ्या भक्तिभावाने बसवतात
छडीची मिरवणूक
छडीची पूजा : अर्चाबरोबर तिची मिरवणूक ही मोठ्या जल्लोषात काढण्याची परंपरा आहे. गुरुपौर्णिमेला छडीची स्थापना झाल्यावर तिसऱ्या दिवशी गोगा देवांची छडी मिरवणूक नदी काठी घेऊन जातात व नदीवर छडीची पूजा होते त्या धार्मिक विधीला खाजामियाला भेटण्यास घेऊन जातात, असे म्हणतात. छडीची पूजा झाल्यावर पुन्हा छडीला मंदिरात आणली जाते.
त्यानंतर नागपंचमीला छडीची मिरवणूक संध्याकाळी निघते नागाला दूध पाजण्यासाठी वर्णेश्वर महादेव मंदिरावर वाजत गाजत घेऊन जातात. मंदिरात पूजा होते, पुन्हा आपल्या स्थानावर आणले जाते. नागपंचमीनंतर नारळी पौर्णिमेला मिरवणूक निघते. या फेरीला गोरक्षनाथ फेरी, असे म्हणतात. गोरक्षनाथ हे गोगादेव यांचे गुरू असल्याने त्यांच्या भेटीसाठी नेतात. गुरूची भेट घेऊन परत आणतात.
शेवटच्या नवमीच्या दिवशी वाजत-गाजत छडीची मिरवणूक निघते. पाचही छड्या गावात फिरतात श्रद्धाळू मोठ्या श्रद्धेने आपल्या इच्छेने दान देतात. रात्री विसर्जनाचा कार्यक्रम होऊन महाप्रसादाचे वाटप होते. छडीच्या कार्यक्रमाचा समारोप होतो. छडीचा उत्सव हा सर्व समाजातील लोकांना एकत्र आणून गुण्या-गोविंदाने जगण्याचा संदेश या छडी उत्सवामागून मिळत असतो.