वरुणराजाच्या अवकृपेच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 19:42 IST2018-11-02T19:41:38+5:302018-11-02T19:42:15+5:30
कमी पावसामुळे यंदा सर्वत्र पाणी टंचाईचे भीषण संकट असताना खरीप हंगामावरदेखील मोठा परिणाम झाला आहे

वरुणराजाच्या अवकृपेच्या झळा
विजयकुमार सैतवाल
जळगाव : कमी पावसामुळे यंदा सर्वत्र पाणी टंचाईचे भीषण संकट असताना खरीप हंगामावरदेखील मोठा परिणाम झाला आहे. परिणामी कडधान्याचे उत्पादन कमी होऊन त्याच्या झळा बळीराजासह उद्योग, व्यापार क्षेत्र तसेच पर्यायाने सर्वसामान्यांना बसू लागल्या आहेत.
पावसाचा लहरीपणा म्हणणे आता नित्याचे झाले आहे. मात्र यंदादेखील अपेक्षित पर्जन्यमान न झाल्याने यास पर्यावरणात वाढता मानवी हस्तक्षेपच कारणीभूत आहे, हे कोणी समजून घेण्यास तयार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कमी पावसामुळे काय परिणाम होऊ शकतो, हे आॅक्टोबर महिन्यापासूनच समोर येऊ लागले असून खरीप हातचा गेल्याने रब्बी हंगामाचीदेखील आता चिंता लागली आहे. अल्प पावसामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचे यंदाही केवळ संकट कायम राहणार नसून ते वाढणार असल्याचे संकेत दिले जात आहे.
पाणी टंचाईसोबतच पिकांवर परिणाम होऊन महागाईच्या झळाही जाणवू लागल्या असून उद्योग क्षेत्रही यामुळे बाधीत झाले आहे. कमी पावसामुळे कडधान्याची आवक घटल्याने त्याचा फटका दालमिललादेखील बसू लागला असून दालमिलचे उत्पादन तब्बल २५ टक्क्याने घटले आहे. त्यामुळे डाळ उद्योग पुन्हा एकदा संकटात ओढावून डाळींचे भावदेखील वाढू लागले आहे.
जळगावातील औद्योगिक वसाहतीमधील डाळ उद्योग हा महत्त्वाचा घटक असून यंदा वरुणराजाच्या अवकृपेने या उद्योगावर मंदीचे ढग ओढावले जात आहे. जळगावात दररोज साधारण ५ हजार क्विंटल डाळीचे उत्पादन होते. मात्र सध्या कडधान्याची आवक घटल्याने या उत्पादनात थेट २५ टक्क्याने घट झाली आहे. ५ हजार क्विंटलपैकी आता दररोज ३७०० ते ३७५० क्विंटल डाळीची निर्मिती होत आहे. यावरूनच कमी पावसाचा किती मोठा परिणाम उद्योगांवर होत आहे, हे स्पष्ट होते.
व्यापार क्षेत्रावरदेखील याचा परिणाम होण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तविली असून सध्या डाळींना मागणी असली तरी भाववाढ कायम राहिल्यास खरेदीदार हात आखडता घेतील व व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
सामान्यांचा विचार केला तर डाळीसाठी ग्राहकांना ८ ते ९ रुपये प्रती किलो जादा मोजावे लागत आहे. मुगाची डाळ ७१०० ते ७६५० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाची डाळही ५३०० ते ५३५० रुपये प्रती क्विंटल, हरभरा डाळ ५४०० ते ५५५० रुपये तर तूरडाळ ५७०० ते ६१५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.