लसीकरणानंतर त्रास झाला नाही तरीही लस तितकीच प्रभावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:24+5:302021-09-08T04:21:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सध्या नवनवीन उच्चांक रोज होत आहेत. त्यातच पहिला डोस घेतल्यानंतर ...

लसीकरणानंतर त्रास झाला नाही तरीही लस तितकीच प्रभावी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सध्या नवनवीन उच्चांक रोज होत आहेत. त्यातच पहिला डोस घेतल्यानंतर अनेकांना ताप, सर्दी, अंग दुखणे, अशी काही लक्षणे जाणवतात. मात्र, ही लक्षणे न आल्यास या लसीचा कोविड विरोधात परिणाम होईल की नाही, अशी शंका अनेकांच्या मनात घर करून असते. मात्र, तुम्हाला ताप येवो अथवा न येवो लस ही सारखीच प्रभावी असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आजपर्यंतचे सर्वाधिक लसीकरण पार पडले. जेवढे अधिकाधिक लसीकरण तेवढे कोविडपासून संरक्षण असे एक समीकरणच असून तसा एक पॅटर्नही जिल्ह्यात तयार झाला आहे. गेल्या दोन महिन्यात कोविडमुळे जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याचे दिलासादायक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे ज्यांचे लसीकरण राहिले आहे त्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
८ ते ९ टक्के लोकांना येतो ताप
लस घेतल्यानंतर ८ ते ९ टक्के लोकांना काही थोडा त्रास होऊ शकतो, मात्र, हा तापही गोळी घेतल्यानंतर आटोक्यात येतो. लहान मुलांना पण लसीकरणानंतर ताप येत असतो. मात्र, तो सर्वांनाच येत नाही. असे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. रावलानी यांनी सांगितले. दरम्यान, शहरात अनेकांनी पहिला डोस घेऊन त्यांची मुदत संपूनही दुसरा डोस घेतलेला नसेल अशांनी महानगरपालिकांच्या केंद्रावर जाऊन दुसरा डोस घेऊन स्वत:ला सुरक्षित करून घ्यावे, असे आवाहन डॉ. राम रावलानी यांनी केले आहे.
लस सारखीच प्रभावी
लस घेतल्यानंतर ताप येणे, अंगदुखी सारखी लक्षणे येतात. तर काहींना काहीच त्रास होत नाही, याचा अर्थ असा नाही की लसीचा परिणाम होणार नाही. प्रत्येकाचे शरीर हे वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देत असते. त्यामुळे तुम्हाला लस घेतल्यानंतर काहीच लक्षणे नसली तरीही लस तेवढीच प्रभावीपणे काम करणार आहे. - डॉ. राम रावलानी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी
आजपर्यंतचे लसीकरण
पहिला डोस : ११,३३,९६५
दुसरा डोस : ४,०४,२३८
कोव्हॅक्सिन : १,७६,८८०
कोविशिल्ड : १३,६०,६४६
मी एप्रिल महिन्यात पहिला डोस घेतला होता व जून महिन्यात दुसरा मात्र, दोनही वेळेला मला कोणताही त्रास झाला नाही. मात्र, लसीकरणामुळे सुरक्षितता मिळते. हे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. ज्यांचे लसीकरण झाले नसेल त्यांनी लस घ्यावी. - शैलेश दुबे, जळगाव
कोविड प्रतिबंधक लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी, सर्दी अशी लक्षणे येतात असे ऐकून होतो. मात्र, मला यापैकी कसलाच त्रास झाला नाही. मात्र, मनात शंका न ठेवता मी दुसरा डोस वेळेत पूर्ण करून घेतला. तुम्ही लसीकरण पूर्ण करून घ्या. - डिगंबर मोरे, जळगाव