चाळीसगावला पुन्हा सुरु झाले लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 18:52 IST2021-04-14T18:51:28+5:302021-04-14T18:52:10+5:30
मंगळवारी रात्री चाळीसगाव तालुक्यासाठी १८०० डोस प्राप्त झाल्याने बुधवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

चाळीसगावला पुन्हा सुरु झाले लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : गेल्या सहा दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला ब्रेक लागला होता. मात्र मंगळवारी रात्री तालुक्यासाठी १८०० डोस प्राप्त झाल्याने बुधवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली आहे. उपलब्ध झालेला साठा दोनच दिवसात संपणार असल्याने पुन्हा लसींचा ठणठणाट निर्माण होण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांसोबतच शहरातील ट्रामा सेंटर व शैलेजा मेमोरियल, बापजी रुग्णालय अशा एकूण १३ ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. सद्यस्थितीत ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षापुढील नागरिकांना देखील लस दिली जात आहे. मध्यंतरी लसीचा साठा संपल्याने सहा दिवस लसीकरण बंद होते. ग्रामीण भागात जनतेत लसीकरणाविषयी जनजागृती झाल्याने नागरिक लसीकरणासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहे.
१८०० डोस आले पण दोनच दिवसात संपणार
तालुक्यात याअगोदर १४ हजार नागरिकांनी लस घेतली आहे. यापैकी दोन हजार नागरिकांनी खासगी रुग्णालयातून लस घेतली आहे. शासकीय केंद्रावर लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या १२ हजार आहे. मंगळवारी रात्री उशिरा १८०० डोस प्राप्त झाले. यामुळे बुधवारी पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. यात ग्रामीण भागासाठी १२०० तर शहरासाठी ६०० डोस मिळाले आहे. एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर दिवसाला ८० ते १२० नागरिकांचे लसीकरण होते. शहरातही एका दिवसाला १५० नागरिकांना लस दिली जाते. मिळालेल्या लसीचा साठा लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता लसीकरण दीडच दिवस चालू शकते. त्यामुळे मोठ्या संख्येने लसीचा साठा मिळणे आवश्यक आहे.