लसीकरणाचे वय ६०, विघ्ने सतराशे साठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:28 IST2021-03-04T04:28:22+5:302021-03-04T04:28:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सोमवारपासून देशभरात ज्येष्ठांसाठी कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरणात दुसऱ्याच दिवशी अनेक ...

लसीकरणाचे वय ६०, विघ्ने सतराशे साठ
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सोमवारपासून देशभरात ज्येष्ठांसाठी कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरणात दुसऱ्याच दिवशी अनेक विघ्ने येत आहेत. हा लसीकरण कक्ष शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिसऱ्या मजल्यावर असल्याने यासाठी ज्येष्ठांना तब्बल ५० पायऱ्या चढून जाव्या लागत आहे. त्यात लिफ्टही बंद आहे. तसेच सर्व्हर डाऊन होण्याची अडचण रोजचीच झाली आहे.
केंद्र शासनाने देशभरात साठच्यावर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोफत केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना लसीकरण कक्षातच या ज्येष्ठांना बोलावले जाते. तेथेच लस दिली जात आहे. मात्र यासाठीचे योग्य नियोजन न केल्याने लस घेणाऱ्या ज्येष्ठांच्या अडचणीतच भर पडत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना लसीकरणासाठी सध्या असलेला कक्ष हा फक्त आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रंट लाईनवर काम करणाऱ्यांना लस देण्यासाठी सुरू केला होता. १६ जानेवारीपासून त्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. तुलनेने तंदुरुस्त असणारे सर्वजण सहजच एवढ्या पायऱ्या चढुन जात आणि लस घेत. मात्र आता ज्येष्ठांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या कक्षात जाण्यासाठी एवढ्या पायऱ्या चढून जाणे ज्येष्ठांसाठी कष्टदायक ठरत आहे. लसीकरण कक्षापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल ५० पायऱ्या चढुन जाव्या लागत आहेत.
सर्व्हर डाऊनची अडचण नेहमीचीच
ज्येष्ठांना लस देतांनाही दररोज फक्त १०० जणांचेच लसीकरण केले जाणार आहे. त्यातच मंगळवारी सकाळी ११ ते ११.४० या वेळेत लसीकरणाचे सर्व्हर डाऊन होते. त्यानंतर फक्त तीन जणांचे लसीकरण करण्यात आले आणि पुन्हा एकदा सर्व्हर डाऊन झाले होते. यामुळे लसीकरणासाठी आलेले वृद्ध नागरिक ताटकळले होते.