पाणी काढण्याच्या बहाण्याने पत्नीला विहिरीत ढकलले;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:22 IST2021-08-25T04:22:08+5:302021-08-25T04:22:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : विहिरीतून पिण्यासाठी पाणी काढायला लावून पत्नीला त्याच विहिरीत ढकलून देत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ...

पाणी काढण्याच्या बहाण्याने पत्नीला विहिरीत ढकलले;
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विहिरीतून पिण्यासाठी पाणी काढायला लावून पत्नीला त्याच विहिरीत ढकलून देत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दीपक रघुनाथ पाटील (रा. तळई, ता. एरंडोल) याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरी व तीन वर्षे दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल न्या. आर.एन. हिवसे यांनी मंगळवारी दिला.
दीपक पाटील व त्याची पत्नी गायत्री असे दोघे जण १० एप्रिल २०१८ रोजी सकाळी ९ वाजता अंतुर्ली, ता. भडगाव येथील भीमराव बाजीराव महाजन यांच्या शेतात काम करीत असताना गायत्री हिला पाण्याची तहान लागली. तेव्हा दीपक हा तिला पाण्याच्या विहिरीकडे घेऊन गेला. माझ्या हाताला लागले आहे, त्यामुळे तू पाणी काढ, असे त्याने पत्नीला सांगितले. त्यानुसार पत्नी ही बादली व दोरीने विहिरीतून पाणी काढत असताना दीपक याने तिला मागून विहिरीत ढकलून दिले. विहिरीत डुबक्या घेत असतानाच तिच्या हाताला मोटारीची वायर लागली. ही वायर धरून ठेवल्यामुळे तिचा जीव वाचला. या वेळी संजय त्र्यंबक पाटील व पती असे दोघे जण विहिरीत उतरले तर आप्पा रामदास महाजन व इतरांनी तिला बाहेर काढून दवाखान्यात दाखल केले. उपचारानंतर गायत्री गलवाडे, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद येथे माहेरी गेली होती. काही दिवसांनंतर भडगाव पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दिल्याने ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
पत्नीची साक्षच ठरली महत्त्वाची
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एन. हिवसे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात पीडित गायत्री हिची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. तपासाधिकारी आनंद पटारे यांच्यासह चार जणांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील प्रदीप एम. महाजन यांनी प्रभावीपणे मुद्दे मांडले. पैरवी अधिकारी जावरे व कुळकर्णी यांनी मदत केली.