सुरतमध्ये सोळाव्या मजल्यावरून पडून अमळनेरच्या दोन तरुणांचा मृत्यू
By संजय पाटील | Updated: September 16, 2022 20:01 IST2022-09-16T20:01:27+5:302022-09-16T20:01:33+5:30
सतरा मजली इमारतीची लिफ्टची दुरुस्ती सुरू असतांना शिडी सरकली.

सुरतमध्ये सोळाव्या मजल्यावरून पडून अमळनेरच्या दोन तरुणांचा मृत्यू
अमळनेर: सतरा मजली इमारतीची लिफ्टची दुरुस्ती सुरू असतांना शिडी सरकली. यामुळे १६ व्या माळयावरून खाली पडून दोन जणांचा मृत्यू झाला. हे दोघे जण शिरूड ता.अमळनेर येथील रहिवासी होते. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता सूरत येथील पांडेसरा भागात घडली.
नीलेश प्रल्हाद पाटील (२८) व आकाश सुनिल बोरसे (२२) अशी या तरुणांची नावे आहेत. सुरत येथील पांडेसरा भागात प्लॅटिनियम प्लाझा या सतरा मजली इमारतीचे बांधकाम सुरु होते. त्यासाठी नीलेश व आकाश हे दोघे जण लिफ्ट बसविण्याचे काम करीत होते. शिडीवर उभे राहून दोघे जण काम करीत होते. यामुळे शिडी अचानक सरकली.
त्यात त्यांचा दोघांचा तोल जाऊन ते १६ व्या मजल्यावरुन खाली पडले. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, दोन्ही जण हे नुकतेच गणेशोत्सव साजरा करून मजुरीसाठी सुरत येथे गेले होते. दोघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. आकाश याच्या पश्चात आई, वडील, भाऊ तर निलेश याच्या पश्चात वडील व भाऊ असा परिवार आहे.