तमाशातील कलावंत तरुण-तरुणीची आत्महत्या; विष पिऊन जीवन संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 22:40 IST2022-02-25T22:39:06+5:302022-02-25T22:40:04+5:30
बाजारात जातो सांगून निघालेल्या दोघांनी केली आत्महत्या; कुटुंबांवर शोककळा

तमाशातील कलावंत तरुण-तरुणीची आत्महत्या; विष पिऊन जीवन संपवलं
जळगाव : भिका - नामा तमाशा मंडळातील तरुण - तरुणीने विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या केली. ही घटना पारोळा शहरात घडली. अंजली अशोक नामदास (२०, रा. दत्त कॉलनी, भुसावळ) व योगेश ऊर्फ सुनील नामदेव बोरसे (१९, रा. अंजाळे, ता. यावल) अशी दोघा मृतांची नावे आहेत.
भिका - नामा तमाशा मंडळातील सदस्य बाभूळवाडी, जि. धुळे येथील तमाशाचे काम आटोपून गुरुवारी दुसऱ्या ठिकाणी जात होते. पारोळा शहरातील कजगाव रोडवरील पेट्रोल पंपाजवळ त्यांचे वाहन नादुरुस्त झाले. त्यामुळे सर्व जण तिथेच थांबले होते.
आम्ही बाजारात जाऊन येतो, असे त्यांनी इतर सहकाऱ्यांना सांगितले. ते लवकर परत न आल्याने मंडळातील अन्य सहकाऱ्यांनी शोध घेतला. विष घेतल्याचे समजल्याने दोघांना गुरुवारी खासगी रुग्णालयात नंतर तर शुक्रवारी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी दोन वाजेच्या सुमारास अंजली हिची प्राणज्योत मालवली, तर योगेशचा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. याबाबत दोघांच्या नातेवाईकांनी पारोळा पोलिसात खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.