ओट्यावर बसलेल्या दोन बहिणींचा विनयभंग, मारहाण; आठ जणांविरुद्ध गुन्हा
By विजय.सैतवाल | Updated: August 25, 2023 18:49 IST2023-08-25T18:49:18+5:302023-08-25T18:49:57+5:30
दुचाकी व घराचेही नुकसान

ओट्यावर बसलेल्या दोन बहिणींचा विनयभंग, मारहाण; आठ जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव : घराबाहेर ओट्यावर बसलेल्या दोन बहिणींचा अगोदर झालेल्या भांडणाच्या कारणावरून विनयभंग करीत त्यांना मारहाण करण्यात आली. या सोबतच दुचाकीचे नुकसान करण्यासह घराच्या काचांचीही तोडफोड करण्यात आली. ही घटना २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात २४ ऑगस्ट रोजी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका भागात असलेल्या महिलेचे व त्याच भागातील दोन जणांमध्ये २३ ऑगस्ट रोजी सकाळी वाद झाला होता. त्यानंतर ही महिला तिच्या बहिणीसह संध्याकाळी घराबाहेर बसलेली होती. त्या वेळी सकाळच्या वादातून त्यांच्या घरासमोर राहणारा एक जण त्याच्या भावासह अन्य सहा जणांना घेऊन आला. दोघी भावांनी महिलांशी गैरवर्तन करीत त्यांचा विनयभंग केला. या दोघांसह अन्य सहा जणांनी लाकडी काठ्यांनी मारहाण करीत धमकी दिली. या सोबत त्यांच्या दुचाकीचे नुकसान करीत घराच्याही काचा फोडल्या.
याप्रकरणी सदर महिलेने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अनंत अहिरे करीत आहेत.