दोन रोहित्र चारचाकी वाहनासह पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:21 IST2021-08-20T04:21:12+5:302021-08-20T04:21:12+5:30
बोदवड : ठेकेदारीच्या वादातून वीज वितरण कंपनीचे दोन रोहित्र चार चाकी वाहनासह पळविल्याची घटना बुधवारी सायंकाळी मुक्तळ गावाजवळ घडली. ...

दोन रोहित्र चारचाकी वाहनासह पळविले
बोदवड : ठेकेदारीच्या वादातून वीज वितरण कंपनीचे दोन रोहित्र चार चाकी वाहनासह पळविल्याची घटना बुधवारी सायंकाळी मुक्तळ गावाजवळ घडली. याप्रकरणी बोदवड पोलिसात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील मुक्तळ येथे जळालेले रोहित्र बदलवून जलचक्र मार्गे बोदवडकडे वीज कंपनीने नियुक्त केलेला ठेकेदार शिवाजी रमेश कठोरे (वय ३५, रा. वडवे, ता. मुक्ताईनगर) यांचा कामावरील चालक विकास कडूसिंग पाटील चार चाकी (क्रमांक एमएच-१९-एस-९६८६) ने येत होता. तेव्हा अज्ञात व्यक्तीने रस्त्यात दुचाकी उभी करून चारचाकी थांबविण्यास लावली. त्यांच्यासोबत ठेकेदार शिवाजी कठोरे यांच्या गावातील गोकूळ समाधान पाटील, चेतन समाधान पाटील, संतोष पालवे हे गाडीतून खाली उतरले. तिघांनी शिवराळ भाषा वापरत चालक विकास कडूसिंग पाटील याला मारहाण केली. दोन रोहित्र घेऊन चोरटे चारचाकी वाहनासह पसार झाले. एकूण दोन लाख ८० हजार रुपयांचे वीज कंपनीचे साहित्य चोरून नेले.
दरम्यान, वीज वितरण कंपनीचा रोहित्र बसवण्याचा ठेका सिद्धेश इलेक्ट्रॉक कंपनीकडून घेतला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या व याच कंपनीचा पूर्वी ठेका गोकूळ समाधान पाटील, चेतन समाधान पाटील, संतोष पालवे या तिघांनी घेतला होता. परंतु हा ठेका त्यांना मिळाला नाही. याचा त्यांना राग होता. त्यामुळे तिघांनी हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून तिघांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.