जळगाव - अमळनेर येथील विविध भागातून दुचाकीची चोरी करणाऱ्या तिघांना शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तिघांकडून एक चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.अमळनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकींची चोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यांचा शोध सुरू केला होता. अखेर चोरट्यांचा सुगावा मिळाल्यानंतर अमळनेरातील ताडेपूरा भागातून संशयित आरोपी अजय ईश्वर भिल (१९), रवी तात्या वैदू (१९) आणि सनी अनिल माचरे (१९, सर्व रा. अमळनेर) या तिघांना अटक करण्यात आली. पोलीसांनी खाक्या दाखविताच दुचाकी चोरी केल्याचे त्यांनी कबुल केले. त्यांच्या ताब्यातील एक दुचाकी हस्तगत केली आहे.