लोकसहभागातून दोन ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 22:47 IST2021-04-05T22:46:50+5:302021-04-05T22:47:51+5:30
मुक्ताईनगर उप जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुडवडा निकाली काढण्यास लोकसहभागातून जमलेल्या पैशातून सोमवारी दोन ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर दाखल झाले आहेत.

लोकसहभागातून दोन ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर : येथील उप जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुडवडा निकाली काढण्यास आ. चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून जमलेल्या पैशातून सोमवारी दोन ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर दाखल झाले आहेत. यात एका ड्युरा सिलिंडरमध्ये ५० जम्बो सिलिंडर बसतील, अशी या ऑक्सिजन सिलिंडरची क्षमता आहे. यामुळे येथील कोविड ऑक्सिजन बेडची संख्या आता दुप्पट म्हणजे ५० पर्यंत पोहोचणार आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड हॉस्पिटल तालुकाच नव्हे तर बाहेरील कोविड रुग्णांसाठी वरदान ठरत रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे यांची रुग्णांप्रती समर्पित भावना व त्याला डॉ. शोएब खान, डॉ. अश्विनी पवार यांचे सहकार्य पाहता हे रुग्णालय कोविड उपचारासाठी रुग्णांच्या पसंतीचे रुग्णालय बनले आहे. अगदी शहरातील प्रतिष्ठित नागरिकही येथे उपचारासाठी दाखल होतात.
डॉक्टरांची समर्पित भावना व त्याला प्रशासन स्तरावर औषध आणि अत्यावश्यक सामग्रीसाठी आ. चंद्रकांत पाटील यांचा सातत्याने पाठपुरावादेखील असल्याचे सांगितले जाते. ज्या गोष्टी प्रशासन स्तरावर सुटत नाही त्या लोकसहभागाने सोडवून रुग्णांना येथेच परिपूर्ण उपचार मिळावा ही भूमिका आ. पाटील यांनी घेतली. त्यातूनच त्यांनी स्वतः आणि व्यापारी वर्गाच्या सहभागातून अवघ्या काही मिनिटांत या शासकीय रुग्णालयासाठी १० लाख रुपये वर्गणी जमा केली आणि जे प्रशासकीयदृष्ट्या सामग्री मिळणे अवघड असेल ते रुग्णालयात लोकसहभागातून उपलब्ध करून दिली जात आहे. यातूनच ड्युरा ऑक्सिजन सिलिंडरची उपलब्धता करण्यात आली आहे.
तब्बल २ लाख रुपये किमतीचे एक असे ५ ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर या रुग्णालयासाठी आणले जाणार आहेत. त्यापैकी २ ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर सोमवारी येथे दाखल झाले आहे. हे सिलिंडर दाखल झाल्याप्रसंगी आ. चंद्रकांत पाटील, डॉ. योगेश राणे, माजी सभापती आनंदराव देशमुख, सुनील पाटील, अफसर खान, स्वीय सहायक प्रवीण पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.