दोन दिवसात जळगावच्या किमान तापमानात ४ अंशाची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 16:28 IST2017-12-06T16:11:59+5:302017-12-06T16:28:27+5:30
ओखी चक्रीवादळामुळे शहराचा वातावरणात मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, दोन दिवसातच शहराच्या किमान तापमानात तब्बल ४ अंशाची वाढ झाली आहे.

दोन दिवसात जळगावच्या किमान तापमानात ४ अंशाची वाढ
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.६-ओखी चक्रीवादळामुळे शहराचा वातावरणात मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, दोन दिवसातच शहराच्या किमान तापमानात तब्बल ४ अंशाची वाढ झाली आहे. सोमवारी १३ अंशावर असलेले शहराचे किमान तापमान बुधवारी १७ अंशावर आले होते. तसेच बुधवारी देखील शहरात दिवसभर ढगाळ वातावरण पहायला मिळाले.
ओखी वादळामुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली तरी, जळगाव जिल्ह्यात काही भागांमध्ये तुरळक ठिकाणीच पावसाची नोंद झाली. बुधवारी देखील जळगाव शहरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. तसेच किमान तापमानात जरी वाढ झाली असली तरी मात्र कमाल तापमानात दोन अंशाची घट झाल्याने दिवसभर वातावरणात गारवा कायम होता. बुधवारी जळगावचे कमाल तापमान २७ अंश इतके होते. तसेच मंगळवारच्या तुलनेत बुधवारी वाºयांचा वेग मंदावला होता. मंगळवारी ताशी १८ किमी वेगाने वाहणाºया वाºयांचा वेग बुधवारी १० ते १२ किमी होता. रब्बीच्या पिकांना ओखी वादळाचा फटका मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता असून, दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहिल्यास हरभरा पिकावर कीड पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत आहेत.
गुरुवारी ही पावसाची शक्यता
गुरुवारी ओखी चक्रीवादळाची तीव्रता देखील कमी होणे अपेक्षित आहे. चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने प्रवास करणार असल्याने महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर पावसाची गुरुवारी देखील शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात प्रामुख्याने नंदुरबार, धुळे, जळगाव येथे हलका पाउस अपेक्षित आहे. तसेच जिल्ह्यातील काही भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा देखील अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.