बारा हजारांत जात पडताळणी प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST2021-01-19T04:19:52+5:302021-01-19T04:19:52+5:30
जळगाव : जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची गेल्या काही दिवसांपासून धावपळ उडत आहे. मात्र, प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे ...

बारा हजारांत जात पडताळणी प्रमाणपत्र
जळगाव : जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची गेल्या काही दिवसांपासून धावपळ उडत आहे. मात्र, प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे दोन ते तीन दिवसांपूर्वी हैराण झालेल्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला होता. याच गोंधळाचा फायदा घेऊन आता कार्यालयात दलालांचा सुळसुळात वाढला असून प्रमाणपत्र लवकर मिळवून देण्यासाठी चक्क बारा हजार रुपयांपर्यंतची मागणी विद्यार्थ्यांकडे होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
नीट व सीईटी परीक्षेच्या माध्यमातून व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जात पडताळणी कार्यालयात ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने अर्ज दाखल केले होते. मात्र, वारंवार चकरा मारूनसुध्दा प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे शुक्रवार व शनिवारी विद्यार्थ्यांनी जात पडताळणी कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला होता. काही पालकांनी चक्क आत्महत्याची धमकी दिली होती. दरम्यान, याच गोंधळाचा फायदा घेऊन पडताळणी कार्यालयात दलाल सक्रिय झाले आहेत. आता विद्यार्थ्यांना २० तारखेपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र महाविद्यालयात सादर करण्याची मुदतवाढ दिली आहे. परंतु, कमी दिवस असल्यामुळे विद्यार्थी कार्यालयात प्रमाणपत्रासाठी रांगा लावत आहेत. त्यामुळे लागलीच प्रमाणपत्र मिळावे, यासाठी १२ हजार रुपयांची मागणी दलालांकडून होत आहे. दरम्यान, यात एका महिलेचाही समावेश असल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले. ही महिला जळगावातील नसून परराज्यातील असल्याचेही त्याने सांगितले.
ऑडिओ क्लिप ‘लोकमत’च्या हाती
बारा हजार रुपयांची मागणी होत असलेली ऑडिओ क्लिप ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. त्यात एका महिलेने विद्यार्थ्याकडून पैशांची मागणी केली आहे. तसेच ती रक्कम प्रमाणपत्र आणून देणाऱ्या व्यक्तीला देण्यात येईल, असे सांगत असल्याचे क्लिपमध्ये आहे.