सुरक्षिततेच्या हमीनंतरच बारावीची परीक्षा घ्यावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:13 IST2021-06-04T04:13:50+5:302021-06-04T04:13:50+5:30

चाळीसगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र ...

Twelfth standard exam should be taken only after security guarantee! | सुरक्षिततेच्या हमीनंतरच बारावीची परीक्षा घ्यावी!

सुरक्षिततेच्या हमीनंतरच बारावीची परीक्षा घ्यावी!

चाळीसगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र याबाबतचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला असून त्यांच्या मान्यतेची मोहोर उमटल्यानंतर परीक्षेबाबत अंतिम निर्णय जाहीर होईल. गेल्या महिन्यात इयत्ता दहावीची परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. अभ्यासक्रमाचे मूल्यमापन होण्यासाठी परीक्षा हवीच; मात्र कोरोना काळात विद्यार्थ्यांची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे, असा सूर विद्यार्थी-शिक्षक, पालक, संस्थाचालक, प्राचार्य यांच्या प्रतिक्रियांमधून व्यक्त झाला. गुरुवारी ‘लोकमत’ने या विषयावर हा संवाद साधला.

कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरत आहे. तिसऱ्या लाटेच्या घंटा वाजविल्या जात आहे. याचबरोबर बारावीच्या परीक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला. परीक्षा हवी की नको, ती कशी घ्यायची, पुढील पदवी परीक्षेसाठी प्रवेश कसे द्यायचे, गुणदान कसे करायचे, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहे. त्यामुळे परीक्षा झाली आणि नाही झाली, तरीही सरकारसह विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचीही कसोटी लागणार आहे.

जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी ४९ हजार प्रविष्ठ

संपूर्ण जळगाव जिल्ह्यात नाशिक विभागीय परीक्षा मंडळाकडे बारावीच्या परीक्षेसाठी एकूण ४९ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. जवळपास अर्धा लाख विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे.

१...यावर्षी जिल्ह्यातून एकूण ५८ हजार विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. गेल्या महिन्यात राज्याच्या शिक्षण विभागाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे या ५८ हजार विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. बारावीच्या परीक्षेबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण काय निर्णय घेते, याकडे राज्यभरातील विद्यार्थी-पालक आणि शिक्षकांचे लक्ष एकवटले आहे.

सर्वमान्य तोडगा काढावा

कोणत्याही इयत्तेचे मूल्यमापन झाले पाहिजे. त्याशिवाय पुढच्या इयत्तेतील प्रवेशाला महत्त्व राहणार नाही. बारावीची परीक्षादेखील याचाच एक भाग आहे. मात्र यावर्षी कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. विद्यार्थी-पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समन्वयातून योग्य तोडगा काढावा. संस्थाचालक म्हणून आम्हीही या निर्णयाबरोबर राहू.

- योगेश रमेशचंद्र अग्रवाल,

संचालक, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी.

प्रवेश परीक्षा अनिवार्य

बारावीची परीक्षा जवळपास रद्दच होऊ घातली आहे. बहुतांशी विद्यार्थ्यांची मानसिकताही तशीच आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द झाली तरी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य करता येईल. परीक्षा घेऊनच या अभ्यासक्रमांना प्रवेश देणे, योग्य होईल.

-अशोक खलाणे, सचिव, महात्मा फुले शिक्षण मंडळ चाळीसगाव.

परीक्षा हवीच

बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात टर्निंग पाॅइंट असते. या टप्प्यावर त्याचे समग्र मूल्यमापन होणे अत्यावश्यक आहे. यासाठीच परीक्षा असतात. या इयत्तेनंतर उच्च शिक्षणाचे दरवाजेही उघडतात. त्यामुळे परीक्षा होऊन मूल्यमापन झाले पाहिजे. कोरोना काळात योग्य नियोजन करून परीक्षा घ्याव्यात.

-डॉ. एस. आर. जाधव, प्राचार्य, य. ना. चव्हाण महाविद्यालय, चाळीसगाव.

........

मूल्यांकन होणेही महत्त्वाचे

कोरोनाची स्थिती भयावह आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकत्र बोलावून लेखी परीक्षा घेणे उचित होणार नाही. मात्र मूल्यांकनही होणेदेखील महत्त्वाचे आहे. दहावीप्रमाणेच बारावी परीक्षेचा निर्णय घ्यावा.

-डॉ. मिलिंद बिल्दीकर,

प्राचार्य, चाळीसगाव महाविद्यालय

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे काय?

एका शैक्षणिक टप्प्यावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन झाले पाहिजे. तथापि, कोरोना हा आजार संसर्गजन्य आहे. परीक्षेसाठी झालेली गर्दी त्याला निमंत्रण देणारी ठरू शकते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही विचार झाला पाहिजे. त्यामुळे परीक्षा घेऊ नये.

-प्रा. वैशाली नितिन पाटील, के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज, चाळीसगाव.

संक्रमण वाढण्याचा धोका

विद्यार्थ्यांची सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले, तर बारावीच्या कोरोनाच्या या लाटेत घेणे संयुक्तिक नाही. आता कुठे बाधितांची संख्या आटोक्यात येऊ लागली आहे. परीक्षेसाठी विद्यार्थी एकत्र आले तर साथ रोगाचे संक्रमण वेगाने वाढू शकते. त्यामुळे परीक्षा रद्द करणे, हाच पर्याय योग्य आहे.

-प्रा. संजय घोडेस्वार, राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज, चाळीसगाव.

परीक्षा घेणेच योग्य

कोरोनाचा धोका आहेच. मात्र त्याबरोबर विद्यार्थ्यांच्या अध्ययन कौशल्याचे मूल्यमापन होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी परीक्षा पर्याय चांगला. बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वापरून का असेना पण बारावीची परीक्षा झालीच पाहिजे.

-प्रा. बी. आर. येवले,

के. आर. कोतकर ज्युनिअर काॕलेज, चाळीसगाव

.........

परीक्षेमुळे आत्मविश्वास वाढतो

विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत पाठविताना मागील वर्गात त्याने कितपत कौशल्य मिळविले हे तपासणे म्हणजेच परीक्षा घेणे. वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी परीक्षा घ्यायलाच हवी. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास वाढीस लागतो.

-प्रशांत मदन जोशी

पालक, चाळीसगाव.

......

आता परीक्षा नको

बारावीची परीक्षा होणार की नाही होणार, हीच चर्चा सुरू आहे. यात बराच वेळ गेला. आम्ही वर्षभरापासून कोरोनामुळे अडचणींचा सामना करून अभ्यास केला. परीक्षा घेण्याची वेळही निघून गेली आहे. संक्रमणाचा धोका वाढला असून कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली आहे. आता परीक्षा न घेणेच चांगले.

-साहिल रवींद्र खैरे

इयत्ता १२ वी, जयहिंद माध्य. विद्यालय, चाळीसगाव.

.......

परीक्षा झाली पाहिजे

आम्ही वर्षभर ऑनलाईन आणि ऑफलाईनही जीव तोडून अभ्यास केला आहे. पदवी परीक्षेसाठीदेखील बारावीची परीक्षा मेरीट की ठरते. परीक्षाच होणार नसेल तर मूल्यमापन कसे होईल? सरसकट निर्णयामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. म्हणूनच कोरोनाची खबरदारी घेऊन परीक्षा झालीच पाहिजे.

-वैष्णवी नामदेव जाधव

इयत्ता १२ वी, के. आर. कोतकर ज्युनि. कॉलेज, चाळीसगाव.

संवादातील निष्कर्ष

परीक्षेसंबंधी निर्णय घेण्यास राज्य शासनाने बराच उशीर केला.

यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला.

व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश कसे देणार, ही अनिश्चितता कायम आहे.

परीक्षा रद्द झाल्यानंतर गुणदान कसे करणार, याबाबत स्पष्टता नाही.

इयत्ता नववी, दहावी, अकरावीच्या गुणांची सरासरी काढून बारावीचा निकाल देण्याचा पर्याय आहे.

गेल्या वर्षी मात्र ११ वीची परीक्षा झालेली नाही.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आॕॅनलाईन अभ्यासात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

..............

महत्त्वाची चौकट

चाळीसगावच्या कोतकर कॉलेजने घेतली ११वीची परीक्षा

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या के. आर. कोतकर कॉलेजने इयत्ता ११वीची परीक्षा नुकतीच ऑनलाईन पद्धतीने घेतली. यात प्रविष्ट असणाऱ्या ६७० पैकी ६०० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. या विद्यार्थ्यांच्या निकाल तयार करण्याचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. यावरून विद्यार्थ्यांचा परीक्षा देण्याकडे स्पष्ट कल दिसून येतो, अशी माहिती प्रा. बी. आर. येवले यांनी दिली.

Web Title: Twelfth standard exam should be taken only after security guarantee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.