जळगाव : जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.अपर्णा पाटील यांची नंदुरबार येथे बदली झाली असून, त्यांनी १ सप्टेंबर रोजी जळगाव येथून कार्यमुक्त होऊन नंदुरबार येथे पदभार घेतला आहे. चाळीसगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लांडे यांच्याकडे देण्यात आला आहे. अद्याप या पदावर पूर्ण वेळ अधिकारी आलेले नाहीत.
जळगावात गेल्या दोन महिन्यांत डेंग्यूचा कहर प्रचंड वाढला आहे. सप्टेंबरच्या दहाच दिवसांत ४४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे. शिवाय यावल येथील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कोरोनानंतर आता डेंग्यूने डोके वर काढले आहे. अशा स्थितीत जिल्हा हिवताप विभागातील कर्मचारी कमतरतेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. त्यातच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.पाटील यांचीच बदली झाली आहे. मात्र, पूर्ण वेळ अधिकारी अद्याप नाहीत.
मलेरियाची शासकीय नोंद नाही
गेल्या दोन महिन्यांतील परिस्थिती बघता जिल्ह्यात एकही मलेरियाचा रुग्ण नसल्याचे शासकीय दप्तरी नोंद आहे. शासकीय सर्वेक्षणानंतर संकलित केलेल्या रक्त नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. त्यानंतर, सद्या तरी शासकीय नोंदीनुसार जिल्ह्यात हिवतापाचा रुग्ण नसल्याची माहिती प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.लांडे यांनी दिली. डेंग्यूसदृश्य व मलेरियासदृश्य रुग्णांमध्ये मात्र, झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.