रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:22 IST2021-02-27T04:22:13+5:302021-02-27T04:22:13+5:30

सुरत-अमरावती एक्सप्रेसला जनरल तिकीट देण्याची मागणी जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेल्या सुरत-अमरावती एक्सप्रेसला आरक्षण ...

Traffic jams due to poor road conditions | रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडी

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडी

सुरत-अमरावती एक्सप्रेसला जनरल तिकीट देण्याची मागणी

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेल्या सुरत-अमरावती एक्सप्रेसला आरक्षण तिकीट असणाऱ्या प्रवाशानांच प्रवेश देण्यात येत आहे. स्थानिक प्रवाशांना व चाकरमान्यांना या गाडीचा कुठलाही उपयोग नाही. तरी रेल्वे प्रशासनाने या गाडीलाही जनरल तिकीट देण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

रेल्वेतून ४० कर्मचारी सेवानिवृत्त

जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनातील विविध विभागातील ४० रेल्वे कर्मचारी शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनिमित्त झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात डीआरएम विवेककुमार गुप्ता या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सरव्यवस्थापक मनोज कुमार सिन्हा, लेखाधिकारी चंद्रकात कदम, एन. डी. गांगुर्डे उपस्थित होते.

स्टेशन समोरील पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी

जळगाव : रेल्वे सेवा सुरळीत सुरू झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे ही पोलीस चौकी नियमितपणे सुरू करण्यात आली होती. मात्र, गेल्या आठवडाभरापासून ही चौकी पुन्हा बंद करण्यात आली आहे. तरी प्र‌वाशांच्या सुरक्षिततेसाठी पुन्हा पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी होत आहे.

पथदिवे सुरू करण्याची मागणी

जळगाव : जिल्हा परिषदेकडून तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी पथदिवे बंद राहत आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाकडून या परिसरात पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

स्वच्छता मोहीम सुरू करण्याची मागणी

जळगाव : शहरातील नवीपेठेत अनेक गल्ली-बोळींमध्ये कचरा साचल्यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तरी मनपा प्रशासनाने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

पार्किंग सुरू करण्याची मागणी

जळगाव : नवीन बस स्थानकात गेल्या दोन वर्षांपासून पार्किंग बंद असल्यामुळे नागरिकांना स्थाकातच वाहने उभी करावी लागत आहेत. यामुळे बस चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.तरी आगार प्रशासनाने स्थानकातील पार्किंग सुविधा पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.

गोलाणी मार्केटसमोर वाहतूक कोंडी

जळगाव :शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी मार्केट समोर मोठ्या प्रमाणावर दुचाकी वाहनधारकांचे अतिक्रमण होत असल्यामुळे दररोज या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे . तरी मनपा प्रशासनाने या वाहनधारकांवर कारवाईची मागणी होत आहे.

तहसीलसमोर अतिक्रमणामुळे कोंडी

जळगाव : तहसील कार्यालयासमोर दररोज दुचाकी वाहने बेशिस्तपणे उभी केली जात असल्यामुळे, दररोज वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने या वाहनधारकांवर कारवाईची मागणी होत आहे.

पंढरपूरसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी

जळगाव : कोरोना सुरू झाल्यानंतर लॉकडाऊनपासून जळगाव आगारातून पंढरपूरची सेवा बंद आहे. यामुळे पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तरी आगार प्रशासनाने पंढरपूरसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Traffic jams due to poor road conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.