नशिराबादकरांनी राखली पोळा सणाची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST2021-09-07T04:20:43+5:302021-09-07T04:20:43+5:30
आनंदाला उधाण : बैलांची शर्यत रंगली, ग्रामस्थांची प्रचंड गर्दी प्रसाद धर्माधिकारी लोकमत न्यूज नेटवर्क नशिराबाद : वाद्यवृंदांच्या गजरात हर्षोल्हासाच्या ...

नशिराबादकरांनी राखली पोळा सणाची परंपरा कायम
आनंदाला उधाण : बैलांची शर्यत रंगली, ग्रामस्थांची प्रचंड गर्दी
प्रसाद धर्माधिकारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नशिराबाद : वाद्यवृंदांच्या गजरात हर्षोल्हासाच्या वातावरणात नशिराबाद येथे पोळा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा असलेल्या बैलांच्या शर्यतीचा कार्यक्रम जल्लोषात झाला. पोळा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यंदा दमदार झालेल्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला. त्यामुळे पोळा सणात यंदा आनंदाला उधाण आले होते. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे गावात पोळा सण साधेपणाने साजरा करण्यात आला होता. बैलांची शर्यत झाली नव्हती. मात्र, आता कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे दिलासा आहे.
कृषीप्रधान संस्कृतीमध्ये पोळा सणाला अनन्य महत्त्व आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. त्यानिमित्त आदल्या दिवशी बैलांना खांदे मळण करण्यात आली. पोळ्याचे आमंत्रण सर्जा राजाला देण्यात येऊन स्नान घालण्यात आले. शिंगांना रंगरंगोटी करून साज श्रृंगार करण्यात आला व त्यांचे पूजन व आरती करून पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना अर्पण करण्यात आला.
बंदुकीचा बार फोडून शर्यतीला प्रारंभ
आठवडे बाजाराच्या प्रांगणात बैलांची शर्यत झाली. सकाळी साडेअकरा वाजता पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन डिगंबर रोटे यांनी बंदुकीचा बार फोडला. अन् शर्यतीस प्रारंभ झाला. कल्याण बुरूज ते विठ्ठल मंदिर दरवाजापर्यंत बैलांची शर्यत झाली. त्यात सुधाकर यादव पाटील यांच्या बैलाने पोळा फोडला. त्यांना नगर परिषदेतर्फे मानाचा फेटा व नारळ देऊन गौरवण्यात आले व मानाच्या पुरणपोळीचा नैवेद्य देत औक्षण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच विकास पाटील, पंकज महाजन, सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील, माजी उपसरपंच किर्तीकांत चौबे, प्रदीप बोढरे, विनोद रंधे, मुकुंदा रोटे, मोहन येवले, चंदू पाटील, अरुण भोई, निलेश रोटे, किशोर पाटील, किरण चौधरी, तुळशीराम येवले, अनिल पाटील, प्रकाश खाचणे, ज्ञानदेव लोखंडे, स्वप्नील रोटे, भूषण कोल्हे, ॲड. प्रदीप देशपांडे, भूषण पाटील, किरण पाटील यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, पोलीस किरण बाविस्कर, हेमंत मेटकरी, रवींद्र इंधाटे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी...
पोळा सणानिमित्त बैलांची शर्यत पाहण्यासाठी नशिराबादसह परिसरातील ग्रामस्थ व महिलांची प्रचंड गर्दी झाली होती. बैलांची शर्यत पाहण्यासाठी अनेकांनी रस्त्याच्या दुतर्फा व इमारतींवर मोठी गर्दी केली होती. अनेकांनी हा सोहळा मोबाईलमध्येसुद्धा कैद केला. दुपारी पावसाचा शिडकावा झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे
शिवशंकर, हनुमान दर्शनाची प्रथा...
सर्जा राजाचे पूजन, आरती करीत शेती अवजारांचे पूजन करण्यात आले. गावात पोळा फोडल्यानंतर शेतकरी सर्जाराजाचे पूजन करतात. पुरणपोळीचा नैवेद्य देऊन बैलजोडींना भगवान शिवशंकर, हनुमान मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आले. प्रार्थना केली.