भडगाव घटनेप्रकरणी कामगार संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:43+5:302021-06-09T04:21:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भडगाव येथील उपकार्यकारी अभियंत्यांना मारहाण व त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या वायरमनलाही धक्काबुक्की होऊन त्यांचा मृत्यू ...

Trade unions aggressive in Bhadgaon incident | भडगाव घटनेप्रकरणी कामगार संघटना आक्रमक

भडगाव घटनेप्रकरणी कामगार संघटना आक्रमक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भडगाव येथील उपकार्यकारी अभियंत्यांना मारहाण व त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या वायरमनलाही धक्काबुक्की होऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने महावितरणच्या सर्व कामगार संघटना चांगल्याच आक्रमक बनल्या आहेत. या कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर एकत्र येऊन या घटनेचा निषेध नोंदविला. तसेच हल्लेखोरांना पाच दिवसात अटक न झाल्यास कामगार संघटनांतर्फे तीव्र काम बंद आंदोलन छेडण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

दोन महिन्यांपूर्वी महावितरणचे अधीक्षक अभियंता फारुख शेख यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडल्यानंतर आता पुन्हा भडगावचे उपकार्यकारी अभियंता अजय घामोरे यांच्यावर सोमवारी दुपारी महावितरणच्या कार्यालयातच अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ गजानन राणे यांनाही त्या हल्लेखोरांनी धक्काबुक्की केली. या मारहाणीत राणे हे जमिनीवर कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वारंवार महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याप्रकरणी कामगार संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोरोना काळातही महावितरणचे कर्मचारी जिवाची बाजी लावून काम करत आहेत. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र काम करत असताना, अशाप्रकारे होणाऱ्या हल्ल्याचा मंगळवारी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून निषेध नोंदविला.

दरम्यान, कामगार संघटनांच्या निषेध आंदोलनात महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर व अधीक्षक अभियंता फारुख शेख यांनी भेट देऊन मृत वायरमनच्या कुटुंबीयांना महावितरणतर्फे योग्य ती शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले, तर कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी मृत वायरमनच्या वारसास महावितरणमध्ये नोकरी व ५० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मिळवून देण्याची मागणी केली.

या निषेध आंदोलनात मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुरेश पाचंगे, झोन सचिव चेतन तायडे, सबाॅर्डिनेट इंजिनियर असोसिएशनचे पराग चौधरी, कुंदन भंगाळे, तांत्रिक संघटनेचे आर. आर. सावकारे, प्रदीप पाटील, वर्कर्स फेडरेशनचे व्ही. के. पाटील, कामगार महासंघाचे सुरेश सोनार, बहुजन फेडरेशनचे बी. डी. जाधव, धर्मभूषण बागूल आदी प्रमुख संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

इन्फो :

राणे कुटुंबीयांचे महावितरणकडून सांत्वन

भडगाव येथे अज्ञात हल्लेखोरांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या तंत्रज्ञ गजानन राणे यांच्या कुटुंबीयांची मंगळवारी महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता फारूक शेख, पराग चौधरी, बहुजन विद्युत अभियंता-अधिकारी व कर्मचारी फोरमचे सचिव विजय सोनवणे उपस्थित होते. राणे यांच्या वारसांना महावितरणकडून कंपनी नियमानुसार साहाय्य करण्याचे आश्वासन मुख्य अभियंता कुमठेकर यांनी यावेळी दिले.

Web Title: Trade unions aggressive in Bhadgaon incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.