जिल्ह्यात मुसळधार; पारोळ्यात सर्वाधिक ८० मिमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:21 IST2021-08-19T04:21:13+5:302021-08-19T04:21:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाचे कमबॅक झाले असून, बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाने हजेरी ...

जिल्ह्यात मुसळधार; पारोळ्यात सर्वाधिक ८० मिमी पावसाची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाचे कमबॅक झाले असून, बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली. मंगळवारी जिल्ह्यात ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ८०.७ मिमी पाऊस पारोळा तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस २८.८ मिमी मुक्ताईनगर तालुक्यात झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात एका दिवसात झालेल्या सर्वाधिक पावसाची नोंद मंगळवारीच झाली आहे. तब्बल १५ दिवसांच्या खंडानंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे बळीराजा सुखावला असून, कापूस, मका व केळीला या पावसामुळे फायदा होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात दरवर्षी सरासरी पर्जन्यमान ७१९.७ मिलीमीटर इतके आहे. ऑगस्ट महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे १९६.१ मिलीमीटर इतके असून, यावर्षी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात ६७.९ मिलीमीटर म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या ३४.६ टक्के इतका पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्याचा एकूण सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस अद्यापही कमी झालेला आहे. कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच कमी पावसामुळे यंदा खरीप हंगामाच्या एकूण उत्पादनात ५० टक्क्यांची घट येण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय झालेला पाऊस (पाऊस मिमीमध्ये)
तालुका - आतापर्यंत झालेला पाऊस - १७ रोजी झालेला पाऊस - एकूण टक्केवारी
जळगाव - ३१५.३ - ४० - ६६.१ टक्के
भुसावळ- २९२.२ - ४२.९ - ६९.६ टक्के
यावल- २९२ - ४५.१ - ६५ टक्के
रावेर- ३२४ - ४६.१ - ७६ टक्के
मुक्ताईनगर- २४७ - २८.८ - ३९ टक्के
अमळनेर- २६२ - ६४.९ - ६५ टक्के
चोपडा- २३३ - ४०.७ - ५० टक्के
एरंडोल- ४०६ - ५७.३ - ९६ टक्के
पारोळा- ४८३ - ८० - ११३ टक्के
चाळीसगाव- ४२७ - ५३.४ - १०९ टक्के
जामनेर- ३६६ - ५२.३ - ७८ टक्के
पाचोरा- ३६४ - ४९.७ - ८६ टक्के
भडगाव- ३५५ - ५९ - ८४ टक्के
धरणगाव- ३८८ - ४५ - ७३ टक्के
बोदवड- ३१८ - ३१ - ७३ टक्के
उशिरा लागवड केलेल्या सोयाबीनला फायदा
अनेक दिवसांपासून पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. ऑगस्ट महिन्याचा पहिल्या पंधरवड्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे उडीद, मूग व सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मंगळवारी व बुधवारी झालेल्या पावसामुळे उडीद व मुगाला फारसा फायदा झालेला नाही. आधीच मूग व उडदाचे नुकसान झाले असून, मंगळवारी झालेला पाऊसदेखील या पिकांना जीवदान देऊ शकलेला नाही तर उशिराने लागवड झालेल्या सोयाबीनला काही प्रमाणात फायदा होणार आहे, तर कोरडवाहू कापसाला या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. यासह केळीला व मक्यालादेखील या पावसामुळे फायदा होणार आहे.
पारोळ्यात सर्वाधिक तर मुक्ताईनगरात सर्वात कमी पाऊस
जिल्ह्यात ऑगस्टपर्यंतच्या सरासरीच्या एकूण ३३३.४ मि.मी. म्हणजेच ७८ टक्के इतका पाऊस झाला आहे. पारोळ्यात तालुक्यात एकूण सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच ११३ टक्के इतका पाऊस झाला आहे, तर मुक्ताईनगर तालुक्यात सर्वात कमी म्हणजेच ३९ टक्के इतका पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू होत असतो, गेल्या दोन वर्षात परतीचा पाऊस नियमित मान्सूनच्या पावसापेक्षाही जास्त झाला आहे. यावर्षी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.