उत्तरसूचीवर आक्षेप नोंदविण्यासाठी आज अंतिम मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:37 IST2021-09-02T04:37:05+5:302021-09-02T04:37:05+5:30
पाचवी - आठवी शिष्यवृत्ती परीक्षा : लवकरचं निकाल जाहीर होणार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात १२ ऑगस्ट ...

उत्तरसूचीवर आक्षेप नोंदविण्यासाठी आज अंतिम मुदत
पाचवी - आठवी शिष्यवृत्ती परीक्षा : लवकरचं निकाल जाहीर होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात १२ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या पाचवी - आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य परीक्षा परिषदेने निकालाची कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठीची अंतरिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे. गुरूवार, २ सप्टेंबरपर्यंत त्यासाठीच्या त्रुटी व आक्षेप नोंदविता येणार आहेत.
पाचवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातून १२ हजार ८३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १० हजार ६९१ विद्यार्थ्यांनी पहिला पेपर दिला, तर तब्बल २ हजार १४६ जण गैरहजर होते. आठवीसाठी असलेल्या परीक्षेसाठी ७ हजार ३५७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ६ हजार ६०९ विद्यार्थ्यांनी पहिला पेपर दिला, तर ७४८ विद्यार्थ्यांनी दांडी मारली होती. दुसरा पेपर दुपारी १.३० ते ३.३० यावेळेत घेण्यात आला होता. पाचवी शिष्यवृत्तीच्या दुसऱ्या पेपरला १० हजार ६६३ विद्यार्थी सामोरे गेले, तर २ हजार १७४ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. तसेच आठवीच्या शिष्यवृत्तीच्या पेपर दोनला ६ हजार ५९९ विद्यार्थी सामोरे गेले, तर ७५८ विद्यार्थ्यांनी दांडी मारली होती. ही परीक्षा १२ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर पार पडली होती.
इयत्ता, पेपरनिहाय उत्तरसूची जाहीर
दरम्यान, या परीक्षेची इयत्ता व पेपरनिहाय उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे. या उत्तरसूचीवर २ सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन निवेदन पालक व शाळांसाठी त्यांच्या लॉगिनमध्ये ‘ऑब्जेक्शन ऑन क्वेश्चन पेपर आणि अंतरिम अन्सर की’ या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आले आहे. २ तारखेनंतर कुठलेही निवेदन स्वीकारले जाणार नसल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.
तज्ज्ञांच्या अभिप्रायानंतर उत्तरसूची होणार जाहीर
विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम सूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहिती व शाळा माहिती प्रपत्रात दुरूस्ती करण्यासाठीसुध्दा २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत शाळांच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.