अखंड सौभाग्य सुख-समृद्धी प्राप्तीचे आज हरतालिका व्रत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:21 IST2021-09-09T04:21:54+5:302021-09-09T04:21:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नशिराबाद : ‘ओम मंदारमाला कुलीताल कालै कपाल मालांचित शेकरायै:। दिव्यांबरायैच दिगंबराय नमःशिवाय नमःशिवाय।।’ अर्थात मंदार वृक्षांच्या ...

अखंड सौभाग्य सुख-समृद्धी प्राप्तीचे आज हरतालिका व्रत
लोकमत न्यूज नेटवर्क
नशिराबाद : ‘ओम मंदारमाला कुलीताल कालै कपाल मालांचित शेकरायै:। दिव्यांबरायैच दिगंबराय नमःशिवाय नमःशिवाय।।’ अर्थात मंदार वृक्षांच्या फुलांच्या वेण्या जिणे घातल्या आहे व जिणे दिव्य वस्त्र परिधान केेले आहे, अशी भगवती आदिमाया पार्वती आणि स्वत: दिगंबर असणारा भगवान शंकर ज्याचे शिरोभूषण नरक पालमालांनी युक्त आहे, त्या दोघांना नमस्कार असो, असे म्हणून पूजन करण्यात येणाऱ्या भाद्रपद शुद्ध तृतीया म्हणजे हरतालिकेचे व्रत गुरुवार, ९ सप्टेंबर रोजी असून सुवासिनींकडून याची तयारी पूर्ण झाली आहे. पार्वतीने शंकराला प्राप्त करून घेण्यासाठी कठोर तप या दिवशी केले होते. या पूजनाने कुमारिकांना सुयोग्य वर मिळतो व विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य, आरोग्य, सुखसमृद्धी, संपत्ती प्राप्त होते, अशी भावना आहे. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना या दिवशी करण्यात येते.
मांडणी व पूजन
सुशोभित केळीच्या खांबांनी मखर करून चौरंगावर वाळूचे शिवलिंग पार्वतीची स्थापना केली जाते. षोडशोपचार पूजन अर्चन विविध वृक्षांचे पत्री, बेलपत्र अर्पण केले जाते. कथा श्रवण करून विविध ऋतू फल अर्पण केले जातात. त्यानंतर आरती केली जाते. त्या दिवशी महिला उपवास करीत शिवशंकराची आराधना करतात असे या व्रताचे महत्त्व आहे. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने), फुलांची पूजा केली जाते. धूप-दीप, निरांजन दाखविला जातो. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात, त्यात जाई, शेवंती, पारिजातक , तुळशी, रुई, शमी, दूर्वा, आघेरडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पाने वाहतात. मनोभावे प्रार्थना करतात. ‘सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे`, अशी प्रार्थना करून आरती केली जाते. या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळतात.