अस्वस्थ गरोदर महिलेस चालक-वाहकाची वेळेवर मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 15:32 IST2020-05-25T15:31:13+5:302020-05-25T15:32:22+5:30
अनेक किलोमीटर अंतर पायी कापणाऱ्या गरोदर मातेस वेळीच मदत मिळाल्याने तिचे प्राण वाचले. यासाठी बसचालक आणि वाहकाने तिला उपचारार्थ रुग्णालयातही दाखल केले.

अस्वस्थ गरोदर महिलेस चालक-वाहकाची वेळेवर मदत
मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : खंडवा (मध्य प्रदेश) येथून अकोला येथे जाणारी गरोदर मजूर महिला मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावरून पायी येत असताना अस्वस्थ स्थितीत कर्की फाट्यावर भर रस्त्यावर होती. अंतुर्लीकडून येणाºया बसचालकास हे दिसले. महिला संकटात असल्याचे लक्षात येताच चालकाने वाहकाला चौकशी करण्यासाठी पाठवले. महिला गरोदरपणात अस्वस्थ झाली पाहून तिला बसमध्ये बसवून थेट उपजिल्हा रुग्णालयात आणून दाखल केले. संकट समयी चालक वाचकाची मदत मिळाल्याने अस्वस्थ महिलेची तब्येत स्थिर झाली आणि तिच्या चेहºयावर हास्य फुलले.
अकोला जाणाºया या गरीब गरोदर महिलेस अस्वस्थ झाल्याने ती आणि तिच्यासोबतची आई अशा दोन्ही महिला रणरणत्या उन्हात कर्की फाट्यावर स्त्यातच बसलेल्या होत्या. त्या महिला संकटात असल्याचे पाहून अंतुर्ली ते मुक्ताईनगर या बसवर कर्तव्यावर असलेले चालक जी.एस.देवकर यांनी बस थांबविली. वाहक राजेश ठाकूर यांना विचारपूस करायला पाठवले. त्यांच्या चौकशीअंती असे लक्षात आली की, ती महिला सात महिन्यांची गरोदर असून त्या मायलेकी खंडवा (मध्य प्रदेश) येथून येत आहेत. त्यात ती गरोदर महिला व तिची आई उपाशीपोटी भरउन्हात बरेच किलोमीटर पायी प्रवास करत आलेली आहे. आपल्या गरोदर मुलीला चक्कर येत आहे, तसेच तिला ऊन लागले, अशी तिची आई सांगत असताना रडायला लागली. चालक व वाहक यांनी त्या दोघींना मुक्ताईनगरला आणले. आधी त्यांच्या फराळाची व्यवस्था केली. तसेच त्यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले केले. त्यांच्याकडे पैसेही कमी होते व त्यांना अजून अकोला जायचे आहे, असे सांगताच वाहक राजेश ठाकूर यांनी मदतीचा हात म्हणून आर्थिक मदत करत आणखी काही मदत लागल्यास फोन नंबर देऊन संपर्क करण्याची विनंती केली.
त्या दोघा मायलेकींनी चालक देवकर व ठाकूर यांचे मनापासून आभार मानले. प्रवाशी हेच दैवत... प्रमाणे दोघांनी एसटीची प्रतिमा जनमानसात अजून उंचावेल अस कार्य केले आहे व देशसेवेत हातभार लावलेला आहे, अशी भावना या वेळी उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.
महिला ही सहा महिन्यांची गरोदर आहे. गरोदरपणात मोठे अंतर पायी चालणे व उन्हामुळे तिला डिहायड्रेशन झाले होते. तिच्यावर उपचार करून तब्बेत स्थिर झाल्यावर कोविड कक्षात ठेवण्यात आले आहे.
-डॉ.निकिता मराठे, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर