निर्बंधांमधील वेळेचा सर्वच पातळ्यांवर उपयोग व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:23+5:302021-07-02T04:12:23+5:30

दुसरी लाट ओसरत आहे, त्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा एक टक्क्यापेक्षा कमी आहे. जिल्हा पहिल्या स्तरात असताना सरसकट सर्वांनाच ...

Time in constraints should be used at all levels | निर्बंधांमधील वेळेचा सर्वच पातळ्यांवर उपयोग व्हावा

निर्बंधांमधील वेळेचा सर्वच पातळ्यांवर उपयोग व्हावा

दुसरी लाट ओसरत आहे, त्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा एक टक्क्यापेक्षा कमी आहे. जिल्हा पहिल्या स्तरात असताना सरसकट सर्वांनाच आता तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे खरच तिसरी लाट पुढे लोटली जाईल, निर्बंधांमुळे यंत्रणेला पुरेसा वेळ मिळेल? यात सर्वांचीच भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

विषाणू त्याची प्रकृती बदलतोय व तो बदलत राहणार. तो जोपर्यंत स्वत:मध्ये बदल करणे थांबवत नाही, तोपर्यंत ही साथ सुरूच राहणार आहे. आपल्याला त्यासोबतच जगावे लागणार आहे, असे तज्ज्ञ सांगतात. आता लावलेल्या निर्बंधांमागची भूमिका समजून घेतली असता यंत्रणेला पुरेसा वेळ मिळेल, ऑगस्टमध्ये येणारी लाट सप्टेंबरपर्यंत पुढे जाईल, या कालावधीत पुरेसे लसीकरण होऊन अधिकाधिक लोक सुरक्षित होऊ शकतात, उपाययोजना अधिक चांगल्या होऊ शकतात, असे काही प्रमुख डॉक्टर सांगतात. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा पॅटर्न बघितला असता लॉकडाऊनचा संसर्ग वाढीवर परिणाम झाल्याचे दिसते. लॉकडाऊनच्या काळात रुग्णसंख्या व मृत्यू कमी झाले आहेत. पहिल्या लाटेत मात्र, या उलट चित्र होते. मात्र, दुसऱ्या लाटेतील विषाणू हा अधिक घातक व अधिक वेगाने पसरणारा होता. त्याने स्वत:त पुन्हा बदल केले असून तो अधिक घातक असू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांचा आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी आपल्यालाही सर्वच पातळ्यांवर सज्ज राहावे लागणार आहे. दुसऱ्या लाटेतील मागणीपेक्षा तीन पटीने तुमच्याकडे ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था असावी, असे आदेश आरोग्य विभागाकडून आले आहेत. त्या दृष्टीने आता उपाययोजना सुरू झाल्या आहेत. साधारण ऑगस्टपर्यंत या सर्व यंत्रणा कार्यान्वित होणार आहेत. तोपर्यंत तरी वेळ हवा. शिवाय लसीकरणात तरुणांचे लसीकरण अद्यापही पुरेसे झालेले नाही, लसींचा तुटवडा असल्याने यात खंड पडत आहे. आतापर्यंत केवळ ५ ते ६ टक्के तरुणांचे लसीकरण झाले आहे. ही संख्या त्यामानाने कमी आहे. हातात असलेल्या वेळेचा त्या पातळ्यांवर उपयोग झाला नाही तर आर्थिक कोंडी तर होईलच शिवाय तिसरी लाट थोपविणे अधिक कठीण जाईल, दोन्ही पातळ्यांवरचे हे अपयश असेल. म्हणून जर लाट पुढे लोटण्यासाठी किंवा यंत्रणेला उपाययोजनांना पुरेसा वेळ मिळविण्यासाठी हे निर्बंध लावले आहेत तर त्या वेळेचा उपयोग व्हावा. अन्यथा लाटा येतच राहतील.

Web Title: Time in constraints should be used at all levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.