डांभुर्णी येथे लाकूड तस्कराचा हल्ला, पोलीस अधिकारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 19:04 IST2020-06-17T19:04:42+5:302020-06-17T19:04:58+5:30
पोलिसांनी पकडलेल्या साडेपाच लाखांच्या सागवान लाकूड प्रकरणातील संशयित आरोपीने पोलिसांवर हल्ला केला.

डांभुर्णी येथे लाकूड तस्कराचा हल्ला, पोलीस अधिकारी जखमी
यावल : पोलिसांनी पकडलेल्या साडेपाच लाखांच्या सागवान लाकूड प्रकरणातील संशयित आरोपीने पोलिसांवर हल्ला केला. त्यात पोलीस निरीक्षक अरुण धनवडे जखमी झाले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री डांभुर्णी, ता.यावल येथे घडली.
सूत्रांनुसार, तालुक्यातील डांभुर्णी-डोणगाव रस्त्यावर १४ जून रोजी पो. नि. अरूण धनवडे यांच्या पथकाने एमएच-५-आर-३७१९ या वाहनातून सागवानी लाकडाची तस्करी करताना गणेश बळीराम बोरसे (वय ४७, रा.डांभुर्णी, ता.यावल) पकडले होते. वनविभागाने पंचनामा करून लाकूड हस्तगत केले होते.
मंगळवारी रात्री बोरसे हा पुन्हा लाकडाची तस्करी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पो. नि. अरूण धनवडे, हे.पो.कॉ. संजय तायडे, नीलेश वाघ व पथकासह संशयित बोरसे याच्या मागावर होते.
बोरसे याच्या डांभुर्णी येथील घरासमोर पोलिसांनी पाळत ठेवली. तेव्हा त्याने पो. नि. धनवडे यांच्या पाठीवर सुरा व लोखंडी पहारने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण धनवडे यांनी पाठीवरील वार चुकवून हातावर झेलला. यात त्यांच्या उजव्या हातास गंभीर जखम झाली आहे. अशाही परिस्थितीत त्यांनी व पथकाने बोरसे यास शिताफीने पकडले. याप्रकरणी बोरसे याच्यावर गुन्हा करण्यात आला आहे. त्याची पोलीस कस्टडी घेऊन अधिक चौकशी करीत आहेत.