नशिराबाद महामार्गावर ‘खून का बदला खून’चा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:20 IST2021-09-22T04:20:27+5:302021-09-22T04:20:27+5:30
जळगाव /नशिराबाद : भावाच्या खुनाची बदल्याची आग खुनानेच शांत केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता नशिराबाद महामार्गावरील सुनसगाव ...

नशिराबाद महामार्गावर ‘खून का बदला खून’चा थरार
जळगाव /नशिराबाद : भावाच्या खुनाची बदल्याची आग खुनानेच शांत केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता नशिराबाद महामार्गावरील सुनसगाव पुलाजवळ घडली. ‘खून का बदला खून’ च्या गोळीबाराचा थरार अनेकांनी याठिकाणी अनुभवला. धम्मप्रिया मनोहर सुरडकर (वय १८, रा.पंचशील नगर, भुसावळ) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव असून मनोहर आत्माराम सुरडकर (वय ४५) असे जखमी पित्याचे नाव आहे. आरोपींनी या दोघांच्या डोळ्यात आधी मिरचीची पूड फेकली त्यानंतर हल्लेखोरांनी गोळीबार व चाकूने वार केले.
लहान मुलांच्या भांडणातून गेल्या वर्षी ११ ऑक्टोबर रोजी कैफ शेख जाकीर या तरुणाचा भुसावळातील पंचशील नगरात खून झाला होता. धम्मप्रिया याने डोक्यात रॉड टाकून कैफचा खून केला होता. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून बदल्याची आग धुमसत होती. कैफच्या खुनाच्या गुन्ह्यात पाच जणांना अटक झाली होती. उर्वरित चार जणांना यापूर्वीच जामीन झालेला आहे तर धम्मप्रिया याची मंगळवारी सायंकाळी जामिनावर मुक्तता करण्यात आली. मुलगा सुटणार म्हणून वडील मनोहर सुरडकर त्याला घ्यायला कारागृहात आले होते. दोघं पिता-पूत्र दुचाकीने (क्र.एम.एच.१९ ए.व्ही.९६५६) घरी जात असताना नशिराबाद महामार्गावर सुनसगाव पुलाजवळ एका टपरीवर सिगारेट घेण्यासाठी थांबले. तेथून पुढे जाणार तितक्यात पुलाखालून तीन जण आले व त्यांनी दुचाकी चालवत असलेल्या धम्मप्रिया याच्यावर गोळीबार केला तर मागे बसलेल्या मनोहर यांच्यावर चाकूने सपासप वार केले.
धम्मप्रियाच्या मानेत तीन गोळ्या
धम्मप्रिया याच्यावर झालेल्या गोळीबारात मानेत तीन गोळ्या गेल्या असून कानालाही चाकूने वार झालेला आहे. एक गोळी पोटातही गेली आहे. घटनास्थळावर दोन राऊंड मिळून आले आहेत. मनोहर यांच्या मानेवर चाकूने वार केलेले आहेत. आणखी वार होण्याआधी ते वाचविले म्हणून मनोहर यांचा जीव वाचला. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले. पुलाखाली ते दबा धरुन बसले होते,अशी माहिती जखमी मनोहर यांनी दिली.
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच घेतला जीव
धम्मप्रिया याचा २२ सप्टेबर रोजी वाढदिवस होता. जामिनावर सुटल्यामुळे वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन धम्मप्रिया व त्याच्या दोन्ही बहिणींनी केले होते, मात्र तत्पूर्वीच ही घटना घडली. धम्मप्रिया याने गेल्या वर्षी खून केला तेव्हा तो अल्पवयीन होता. लोखंडी रॉड डोक्यात टाकल्याने गंभीर दुखापत होऊन कैफ शेख जाकीर याचा मृत्यू झाला होता. कैफचा भाऊ समीर, रेहान व आणखी एक अशा तिघांनी हा हल्ला केल्याचे मनोहर सुरडकर यांनी सांगितले.
...तर वाचला असता जीव
खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी तसेच सराईत गुन्हेगार कारागृहातून सुटल्यानंतर त्यांना थेट घरी न जाऊ देता स्थानिक गुन्हे शाखेत आणून त्यांच्याविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. त्याशिवाय त्यांचा अर्ज येथे भरला जातो, धम्मप्रियाच्या बाबतीत मात्र अशी कोणतीच कारवाई झाली नाही. त्याच्यावर कारवाई झाली असती तर कदाचित त्याचा जीव वाचला असता.