रामेश्वर तीर्थावर तापी नदीत एकाच कुटुंबातील तिघे बुडाले; दोघांचा मृतदेह सापडला
By विजय.सैतवाल | Updated: August 21, 2023 19:15 IST2023-08-21T19:15:18+5:302023-08-21T19:15:34+5:30
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जळगाव तालुका पोलिस आणि धुळे येथील एसडीआरएफचे पथक दाखल झाले

रामेश्वर तीर्थावर तापी नदीत एकाच कुटुंबातील तिघे बुडाले; दोघांचा मृतदेह सापडला
विजयकुमार सैतवाल
जळगाव : श्रावण सोमवारनिमित्त जळगाव तालुक्यातील रामेश्वर तीर्थक्षेत्रावर कावडयात्रा घेऊन आलेल्या एरंडोल तालुक्यातील तरुणांच्या गटातील तीन जण तापी नदीत बुडाले. या पैकी दोन जणांचे मृतदेह सापडले असून तिसऱ्याचा शोध सुरू आहे. हे तिघही जण चुलत भाऊ आहेत. ही घटना सोमवार, २१ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. पहिल्याय श्रावण सोमवारी घडलेल्या दुर्घटनेने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
श्रावण सोमवारनिमित्त एरंडोल शहरातील भगवा चौकातील ५० तरुणांचा एक गट सोमवार, २१ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता जळगाव तालुक्यातील गिरणा, तापी आणि अंजनी नदीच्या त्रिवेणी संगमावरील रामेश्वर महादेव मंदिरावर कावडयात्रा घेऊन दर्शनासाठी गेला. तेथे दर्शन घेऊन दुपारी साडेतीन वाजता पियुष रवी शिंपी (२३), सागर अनिल शिंपी (२३) व अक्षय प्रवीण शिंपी (२२) पोहण्यासाठी तापी नदीत उतरले. त्या वेळी त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही व तिघेही जण पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जळगाव तालुका पोलिस आणि धुळे येथील एसडीआरएफचे पथक दाखल झाले. तिघांचा शोध घेत असताना दोघांचे मृतदेह हाती लागले. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. तिसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे.