बस व कारच्या अपघातात धुळ्यातील तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 22:58 IST2020-02-09T22:47:23+5:302020-02-09T22:58:39+5:30
धुळे येथील चौधरी कुटुंब हे मुलाचा पाचोऱ्याहून साखरपुडा आटोपून घरी परतत असताना रविवारी सायंकाळी सात वाजता आशिया महामार्गावर पारोळा धुळे रोडवर विचखेडे गावानजीक बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील नवरदेवाचे वडील, बहीण आणि काकू हे तीन जण जागीच ठार झाले, तर आई, काका आणि पुतण्या हे गंभीर जखमी झाले आहेत.

बस व कारच्या अपघातात धुळ्यातील तीन ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : धुळे येथील चौधरी कुटुंब हे मुलाचा पाचोऱ्याहून साखरपुडा आटोपून घरी परतत असताना रविवारी सायंकाळी सात वाजता आशिया महामार्गावर पारोळा धुळे रोडवर विचखेडे गावानजीक बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील नवरदेवाचे वडील, बहीण आणि काकू हे तीन जण जागीच ठार झाले, तर आई, काका आणि पुतण्या हे गंभीर जखमी झाले आहेत.
धुळे येथील संजय नारायण चौधरी (रा.टाटा मोटर्सच्या बाजूला) हे मुलगा दिनेश संजय चौधरी याचा साखरपुडा पाचोरा येथील प्रकाश चौधरी रा.प्रकाश टॉकीजजवळ या कुटुंबासोबत ९ रोजी होता. यासाठी संजय नारायण चौधरी हे आपली कार (एमएच-१८-बीसी-०५७५) सह अन्य दोन गाड्यांद्वारे गेले होते. सायंकाळी सातच्या सुमारास आशिया महामार्गा ४६ वर पारोळा धुळे रोडवर पारोळ्यापासून तीन कि.मी. अंतरावर विचखेडे गावानजीक धुळ्याकडून पारोळ्याकडे येणारी बस शिर्डी-भुसावळ (एमएच-२०-बीएल-३९४३) बसने जोरात धडक दिली. त्यात या कारमधील नवरदेवाचे वडील संजय नारायण चौधरी , बहीण मीनल संजय चौधरी, काकू सरला रविंद्र चौधरी हे तीन जण जागीच ठार झाले, तर आई नीता संजय चौधरी , काका रवींद्र नारायण चौधरी , पुतण्या विवान स्वप्नील चौधरी सर्व रा.धुळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे .