दीडशे रुपयांसाठी लागणार हजारांचे बँक खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:56+5:302021-07-02T04:12:56+5:30

जिल्ह्यात ४ लाख ६६ हजार ५७३ शालेय पोषण लाभार्थी विद्यार्थी -डमी-स्टार-८६७ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : उन्हाळी सुटीतील शालेय ...

Thousands of bank accounts for one and a half hundred rupees | दीडशे रुपयांसाठी लागणार हजारांचे बँक खाते

दीडशे रुपयांसाठी लागणार हजारांचे बँक खाते

जिल्ह्यात ४ लाख ६६ हजार ५७३ शालेय पोषण लाभार्थी विद्यार्थी

-डमी-स्टार-८६७

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता त्याऐवजी आहाराचे अनुदान थेट लाभ हस्तांतरणद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील ४ लाख ६६ हजार ५७३ विद्यार्थ्यांच्या पालकांना दीडशे रुपयांच्या निधीसाठी एक हजार रुपयांचे बँक खाते काढावे लागणार आहे. त्यामुळे हे पालकांना परवडणारे नाही. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे पालक खाते काढण्यासाठी पाल्यांना बँकामध्ये घेऊन जात असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दोनशे ते तीनशे रुपये रोजाचा दिवस बुडवून खाते उघडण्यासाठी जावे लागत असल्यामुळे मोलमजुरी करणाऱ्यांनी नागरिकांनी सुद्धा या निर्णयासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच शासनाने काढलेले पत्रक शिक्षण विभागालाही प्राप्त झाले आहे. दरम्यान, एका महिन्याच्या अनुदानासाठी बँक खाते उघडण्यास सांगितले जात असल्यामुळे पालक वर्गातून सुद्धा संतापाची लाट उसळली आहे.

----------

बँक खाते उघडण्यासाठी लागणार हजार रुपये

- अनुदानासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत बँक खाते उघडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असून त्यामध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या काळात विद्यार्थ्यांना बँकेत खाते काढणे धोकादायक ठरणार आहे.

-शालेय पोषण आहाराकरिता धान्यासाठी अनुज्ञेय असलेल्या दराप्रमाणे सुटीतील ३५ दिवसांचे अनुदान इयत्ता पहिली ते पाचवीकरिता १५६ रुपये तर इयत्ता सहावी ते आठवीकरिता २३४ रुपये अनुज्ञय ठरणार आहे. त्यामुळे दीडशे रुपयांच्या निधीकरिता एक हजार रुपयांचे बँक खाते परवडणारे नाही, अशी ओरड पालकांकडून होऊ लागली आहे.

- शिवाय बचत खात्यावर नियमित व्यवहार होत नसल्यास बँकेकडून दंड आकारला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे बचत खाते हे त्रासदायक होते. तेवढेच नुकसानकारकसुद्धा आहे.

----------

पालकांची डोकेदुखी वाढली

कमी अनुदानासाठी अधिक रकमेचे खाते उघडणे हे परवडणारे नाही. या निर्णयाचा पालक वर्गातून विरोध होत आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा फेरविचार करणे गरजेचे आहे.

- तुकाराम चौधरी, पालक

मजुरी करून दिवसाला दोन ते तीनशे रुपये मिळतात. दीडशे रुपयांसाठी बँकेत खाते उघडण्यास गेल्यास एका दिवसाचा रोज बुडेल. त्यामुळे शासनाने पालकांच्या खात्यात पैसे वर्ग करावे, अन्यथा निर्णयाचा फेरविचार करावा.

- प्रदीप बारेला, पालक

-------

शिक्षक संघटनांचाही विरोध

उन्हाळी सुटीतील आहाराचे अनुदानासाठी बँक खाते काढण्याच्या निर्णयाचा जळगावातील काही शिक्षक संघटनांनी सुद्धा विरोध दर्शविला आहे. तसेच हा निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. तसेच निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारासुद्धा संघटनांनी दिला आहे.

------

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार - १५६

सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार - २३४

------

तालुकानिहाय लाभार्थी संख्या

अमळनेर - २९१०९

भडगाव - १८४९९

भुसावळ - ३०७८८

बोदवड - १०३५८

चाळीसगाव - ५११७६

चोपडा - ३४१९७

धरणगाव - १८३९५

एरंडोल - १९१०५

जळगाव - ६२४०७

जामनेर - ४२५५१

मुक्ताईनगर - १८४८८

पाचोरा - ३४१९४

पारोळा - २२७५०

रावेर - ३१७२४

यावल - २७८०२

Web Title: Thousands of bank accounts for one and a half hundred rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.