सुप्रिम कॉलनीतील महिलांचा दोन महिन्यात मनपावर तिसरा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:32 IST2019-04-30T12:31:58+5:302019-04-30T12:32:27+5:30
खासगी कंपनीकडून पाणी देण्याचे दिले आश्वासन

सुप्रिम कॉलनीतील महिलांचा दोन महिन्यात मनपावर तिसरा मोर्चा
जळगाव : पंधरा-पंधरा दिवस पाणी येत नसल्याने सुप्रिम कॉलनीतील शेकडो महिलांनी सोमवारी मनपावर मोर्चा आणत, जर चार दिवसात या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर मुला-बाळांसह मनपात ठिय्या आंदोलनाचा इशारा या भागातील महिलांनी मनपा प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, पाण्याचा प्रश्नासाठी या भागातील महिलांचा दोन महिन्यातील हा तीसरा मोर्चा असून, प्रशासनाकडून देखील तिनही वेळा एकच उत्तर देण्यात आले आहे.
शहरातील सुप्रिम कॉलनी भागात पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत जात असून, या भागातील नागरिक हैराण झाले आहेत. मनपा प्रशासनाकडून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने या भागातील महिलांनी नगरसेवक गणेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी १२ वाजता मनपा आयुक्तांच्या दालनात मोर्चा आणला. तसेच काही महिला व नगरसेवक गणेश सोनवणे यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता डी.एस.खडके हे देखील उपस्थित होते. सुप्रिम कॉलनीतील महिलांनी मार्च महिन्यात दोनवेळा मनपात मोर्चे आणले होते. तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही इशारा दिला होता. मात्र, तेव्हाही प्रशासनाने केवळ आश्वासन दिले होते.
कोणाही कडून पाणी घ्या, पण आम्हाला पाणी द्या
आयुक्तांनी यावेळी एमआयडीसीकडून पाणी घेण्यात येणार असून, लवकरच या भागात पाणी पुरवठा नियमित करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र, या भागातील महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत प्रत्येकवेळा मनपात मोर्चा आणल्यानंतर प्रशासनाकडून चार दिवसात पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले जाते. तर आमदार सुरेश भोळे देखील अनेक महिन्यांपासून केवळ आश्वासन देत असून, ते देखील जैन इरिगेशनकडून पाणी आणून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र, कोणाही कडून पाणी आणा, पण आम्हाला पाणी द्या अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी महिलांनी व्यक्त केली.