दापोरा, ता. जळगाव : दापोरा येथे अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी नदीपात्रातून येणाऱ्या मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे वाळू उपशास आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासाठी पोलीस पाटील जितेश गवंदे यांनी आपले दोन महिन्यांचे मानधन दिले आहे.
दापोरा येथील गिरणा नदीपात्रातून अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. महसूल प्रशासन, पोलीस देखील कारवाईसाठी येतात, मात्र त्यापूर्वीच नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा करणारे वाहने घेऊन पसार होत असल्याने सर्वांनाच खाली हातानेच परत जावे लागत होते. वारंवार उपाययोजना करूनही वाळूचा उपसा सुरूच राहतो. दापोरा येथील गिरणा नदीपात्रातून येणारा मुख्य एकच रस्ता असल्याने मागील आठवड्यात ‘लोकमत’ने वाळू उपसा थांबेना या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तहसीलदारांनी ग्रामदक्षता समितीस बैठक घेऊन वाळू उपसा रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी सरपंच कविता वाणी यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम दक्षता समितीची बैठक घेण्यात येऊन सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे ठरले. मात्र, ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती नसल्याने दापोरा येथील पोलीस पाटील जितेश गवंदे यांनी आपले दोन महिन्यांचे मानधन देत सीसीटीव्ही यंत्रणा बसवून कार्यान्वित केली.
दापोरा येथील अवैध वाळू उपसा संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. आता ग्रामदक्षता समितीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून महसूल प्रशासनास मदत केली आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करतो. पोलीस पाटलांनी स्वत:चे मानधन देऊन एक कौतुकास्पद कार्य केले आहे. या यंत्रणेचे कोणी नुकसान केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
- नामदेव पाटील, तहसीलदार.