चोर पोलिसांचा खेळ! चोर सापडतात, चोरीचा माल का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:22 IST2021-08-19T04:22:10+5:302021-08-19T04:22:10+5:30
सात महिन्यांत शहरात १०० चोरीच्या घटना लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांमध्ये चोरी व ...

चोर पोलिसांचा खेळ! चोर सापडतात, चोरीचा माल का नाही?
सात महिन्यांत शहरात १०० चोरीच्या घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांमध्ये चोरी व घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. पोलीस प्रशासनाकडून चोरी व घरफोडीच्या आरोपींना पकडण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असतात. त्याच अनुषंगाने अनेक घटनांमधील चोर काही दिवसांत गजाआड केले जातात. मात्र, एकीकडे चोरीच्या घटनेतील चोरांना काही दिवसांतच पोलीस प्रशासनाकडून पकडले जात असतात. दुसरीकडे मात्र, चोरीमध्ये चोरीला गेलेले साहित्य व रोख रक्कम मात्र चोरट्यांकडून परत नसल्याचेही प्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे चोर पोलिसांच्या या खेळात चोरी करणारे चोर सापडतात. मात्र, चोरीचा माल का नाही? असा प्रश्न आता निर्माण केला जात आहे.
जळगाव शहरात जानेवारीपासून ते जुलै महिन्यापर्यंत एकूण १०० चोरी व घरफोड्यांचा घटना घडल्या आहेत. त्यापैकी सुमारे ७० च्या वर घटनेतील आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, अनेक घटनांमध्ये झालेल्या चोरीचा माल मात्र परत मिळू शकलेला नाही. यामध्ये अनेकदा रोख रक्कम असते. ती रक्कम चोरांकडून अटक होण्याआधीच खर्च केली जाते. त्यामुळे ही रक्कम मिळू शकत नाही.
हे पाहा आकडे
जानेवारी - १८
फेब्रुवारी - २१
मार्च - १७
एप्रिल - १०
मे - ४
जून - १७
जुलै - १३
१५ लाखांची लूट साडे ९ लाख हस्तगत
५ मार्च रोजी पंचमुखी हनुमान मंदिराजवळ काही चोरट्यांनी महेश भावसार यांच्याकडून पिस्तुलाचा धाक दाखवून १५ लाखांची रोकड लुटली होती. पोलिसांनी चार दिवसांत चोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. या लुटीमधून पोलिसांनी चोरट्यांकडून साडे ९ लाखांची वसुली केली होती.
अडीच लाखांच्या दागिन्यांची बॅग परत
रामेश्वर कॉलनीत चार महिन्यांपूर्वी लग्नासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील काही जणांचे अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. पोलिसांनी काही दिवसांतच या प्रकरणातील चोरट्यांना अटक करून, सर्व अडीच लाखांचे दागिने जमा करून, ते संबंधित नागरिकांना परत केले होते.
घरफोड्यांचे चोर ही सापडले नाहीत
तालुक्यातील आव्हाणे येथे जून महिन्यात एकाच रात्री १३ घरांमध्ये घरफोड्या झाल्या होत्या. या घरफोड्यांमध्ये ३ लाखांहून अधिकच्या रकमेची लूट चोरट्यांनी केली होती. या प्रकरणी तालुका पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात अपयश आले आहे. मात्र, याच गावातील दुसऱ्या प्रकरणात मात्र पोलिसांनी आरोपींना काही दिवसांतच अटक केली होती.
कोट...
बहूतांश मोठ्या गुन्ह्यांमध्ये दागिने असो किंवा रोकड हस्तगत करण्यात आलेली आहे. रक्कम काही वेळा चोरटे किंवा दरोडेखोर हे पैशांची विल्हेवाट आधीच लावतात, तर काही प्रकरणात व्यसनावर उधडपट्टी होते. ऐवज हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून पुरेपूर प्रयत्न केला जातो.
- डॉ.प्रवीण मुंढे, जिल्हा पोलीस अधीक्षक.