लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने देशभरात अमृतमहोत्सवी भारत या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात पुढील ७५ आठवड्यांत ७५ नावीन्य पूर्ण कार्यक्रमांचे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विविध विभागांना दिल्या. हे कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत केले जाणार आहे.
अमृतमहोत्सवी भारत उपक्रमाचे आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक पार पडली. यावेळी उपवनसंरक्षक विवेक होशिंग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुल पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी मीनल कुटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे, तहसीलदार सुरेश थोरात उपस्थित होते.
विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार सर्व संबंधित विभागांनी त्याचे नियोजन करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. संबंधित विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानुसार विभागांनी आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीनुसार कार्यक्रम घेण्याच्या सूचनाही राऊत यांनी या बैठकीत दिल्या.