रेमडेसिवीरची चार हजार इंजेक्शन आली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:16 IST2021-04-09T04:16:34+5:302021-04-09T04:16:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी जिल्ह्याला तीन हजार रेमडेसिवीरचे इंजेक्शन देण्याचे ...

रेमडेसिवीरची चार हजार इंजेक्शन आली
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी जिल्ह्याला तीन हजार रेमडेसिवीरचे इंजेक्शन देण्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना आश्वासन दिले होते. त्यानुसार ३ हजार व अतिरिक्त १ हजार असे ४ हजार इंजेक्शन बुधवारीच जिल्ह्याला प्राप्त झाले असून, हे इंजेक्शन मागणीनुसार रुग्णालयांना तातडीने देण्यात आल्याची माहिती औषध निरीक्षक डॉ. अनिल माणिकराव यांनी दिली.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिवीरचा पुरवठा कमी असल्याने तुटवडा निर्माण झाला होता. अखेर या इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे त्याच्या विक्रीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने नियंत्रण आणले होते. त्यात हे केवळ कोविड रुग्णालयांनाच मागणीनुसार पुरविले जाईल, असे निकष ठरविण्यात आले. मात्र, या रुग्णालयांना हे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना ते उपलब्ध करून द्यावे, असे रुग्णालयांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ अधिकच वाढली होती. अशा स्थितीत माजी मंत्री एकनाथ खडसे व माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांनी नुकताच मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे हा विषय मांडून इंजेक्शनची मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी (दि. ७) हे इंजेक्शन पाठविण्यात आले.
वॉर रूममधूनही योग्य मार्गदर्शन
रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी नातेवाइकांची भटकंती थांबावी व रुग्णाला निश्चित ठिकाणी ते मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रूममधूनही योग्य मार्गदर्शन होत आहे. कोणत्या रुग्णालयाच्या मेडिकलवर किती इंजेक्शन उपलब्ध आहेत, याची माहिती वॉररूममध्ये उपलब्ध असते, त्यानुसार ती संबंधितांकडून रुग्णालय विचारून त्याला जवळ असलेल्या मेडिकलची माहिती या ठिकाणाहून दिली जाते.
रेमडेसिवीरची मागणी का वाढली?
रेमडिसिवीर हे इंजेक्शन विषाणूचा वाढता संसर्ग रोखते, म्हणजेच एका विषाणूपासून दुसरा विषाणू तयार होऊ देत नाहीत. हे इंजेक्शन सलाईनद्वारे पहिल्या दिवशी दोन, तर पुढील चार दिवस प्रत्येकी एक असे सहा डोस दिले जातात. याने विषाणूंची संख्या मर्यादित राहते व हळूहळू कमी होते. याचे चांगले निष्कर्ष शासकीय यंत्रणेत समोर आल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले आहे.
निकष काय?
साधारणत: एचआरटीसीटीचा स्कोअर हा नऊपेक्षा अधिक असेल तेव्हा रुग्णावर या इंजेक्शनचा वापर करावा, असे काही डॉक्टर मानतात. मात्र, शासकीय यंत्रणेतील तज्ज्ञांच्या मतानुसार स्कोअर १० ते ११ असेल तेव्हाच हे इंजेक्शन वापरावे, तेही सुरुवातीच्या १० दिवसांच्या आत वापरले तरच त्याचा प्रभाव होतो, असेही डॉक्टर सांगतात.