तिकडे युद्ध पेटले, इकडे रविवारीही सोने वधारले; खरेदीदार चिंतेत पडले
By विलास बारी | Updated: October 8, 2023 16:54 IST2023-10-08T16:53:43+5:302023-10-08T16:54:00+5:30
Gold Rates Today: तीन दिवसात ११०० रुपयांची वाढ

तिकडे युद्ध पेटले, इकडे रविवारीही सोने वधारले; खरेदीदार चिंतेत पडले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : इस्त्राएल व हमास यांच्यातील युद्धामुळे पहिल्या दिवसापासून परिणाम होत असलेल्या सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी ६०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ५८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. रविवार असतानादेखील सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. चांदी मात्र ६९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.
१० दिवसांपूर्वी सोने-चांदीच्या भावात घसरण व्हायला सुरुवात झाली. मात्र त्यात पुन्हा वाढ होत असताना हमास व इस्त्रायल यांच्यातील युद्ध भडकले. त्यामुळे शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी चांदीच्या भावात एक हजार ६०० रुपयांची वाढ झाली. तर सोन्याचे भाव ३०० रुपयांनी वाढले होते. त्यानंतर रविवार, ८ ऑक्टोबर रोजी पुन्हा सोन्याच्या भावात ६०० रुपयांची वाढ झाली. एरव्ही रविवारी फारसी ग्राहकी नसते व भावही स्थिर असतात. मात्र हा रविवार त्याला अपवाद ठरला आहे.
युद्धामुळे हे भाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे. ५ ऑक्टोबर रोजी सोने ५७ हजार ४०० रुपये प्रति तोळा होते. तीन दिवसात त्यात एक हजार १०० रुपयांची वाढ झाली आहे.