मन्याड धरणाच्या ओव्हरफ्लोमधून गिरणा नदीत वाया जाणारे पाणी मागील दहा-पंधरा दिवसांपासून जामदा डाव्या कालव्यात सोडण्यात आले आहे. यातून पारोळा तालुक्यातील म्हसवे तलाव व भोकरबारी धरण भरण्यात येत आहेत. गिरणेवरील जामदा बंधारा येथून जामदा डावा कालवा निघतो. चाळीसगाव व भडगाव तालुक्यात जवळजवळ ५०-७० मैलापर्यंत कालव्याची लांबी आहे.
लाखो हेक्टर शेतजमीन कालव्याखाली येते. कालव्यापासून अर्धा ते एक कि.मी. पर्यंत कालवा वितरिका (चाऱ्या) यातून कालव्याचे पाणी पाझरते. शिवाय कालव्याखाली उताराची शेतजमीन आहे. जामदा कालवा या दोन्ही तालुक्याच्या हद्दीत पाझरतो. हे पाणी उतारावरील शेतजमिनीत वाहते. यामुळे सततच्या पाण्याने पिकांची मुळे पोखरुन निघत आहेत. अतिपाण्याने मूळ कुजत, सडत आहेत.
कायमची डोकेदुखी
दरवर्षी पावसाळ्यात गिरणा किंवा मन्याड धरण भरल्यानंतर गिरणा नदीत वाया जाणारे पाणी या जामदा कालव्यात टाकले जाते. तेथून म्हसवे तलाव व भोकरबारी भरण्यात येते. २५० ते ४०० क्युसेसने कालवा चालविला जातो. पंधरा दिवस ते महिनाभर हे पुनर्भरण चालते. याचवेळेस या दोन तालुक्यात पाऊस अधिक झाल्यास निदान त्याकाळात पाटबंधारे विभाग व पाण्याची मागणी करणाऱ्या अनेक तालुक्यांनी वरच्या शेतकऱ्यांचा विचार करावयास हवा. या काळात पाणी बंद ठेवायला हवे. शेतजमीन कोरडी असल्यास कालव्यातून पाणी सोडण्यास व पुनर्भरणास हरकत नाही. ही माफक अपेक्षा या बाधित शेतकऱ्यांची आहे.
शिंदी येथील शेतकरी रमेश केशव पाटील यांनी ‘लोकमत’ला आपली व्यथा मांडताना सांगितले की, कालव्याखालील विहिरी या पाझरामुळे तुडुंब भरल्या आहेत. त्या वरून ओसंडत उभ्या कपाशीत पाणी पंधरा दिवसापासून वाहत आहे. यामुळे संपूर्ण उत्पन्न बुडाले आहे. देवबानं झाय् थोड्..पाटबंधारांनी. धाड् घोडं..! पावसाचे पाणी कमी झाले की काय? पाटबंधारे विभागाने कालव्याला पाणी सोडत शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर पाणी फिरवले.
ही कालव्याखालील जामदा, भऊर, बहाळ, गुढे, कोळगाव, शिंदी, खेडगाव, शिवणी, वडगाव, नालबंदी, वलवाडी ते थेट आमडदे पर्यंतच्या शिवारातील शेतकऱ्यांची व्यथा आहे.
अन्यथा पाटबंधारे विभागाने भरपाई द्यावी.
दरवर्षी पावसाळ्यात नदीजोडच्या नावाखाली पारोळा, एरंडोल, अमळनेर व धरणगाव तालुक्यात गिरणा नदीत वाया जाणारे पाणी जामदा कालव्यातून सोडण्यात येते. यावर्षीदेखील म्हसवे, भोकरबारी धरणाचे पुनर्भरण करण्यात येत आहे. ये रे माझ्या मागल्या.. यानुसार त्या-त्या वेळेस या हजारो शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकऱ्यांनी उपोषणदेखील केली. मात्र ही डोकेदुखी कायम आहे. एक-दोन शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला सळो की पळो.. करून सोडले. तेथे कालव्याखाली ड्रेनेज काढले. कालवा काँक्रिटीकरण करण्यात आला. इतर हजारो शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले. दोन्ही तालुक्यात कालवा अस्तरीकरण व कालव्यास संमातर कालव्याखाली ड्रेनेज काढण्याची गरज आहे अन्यथा आम्हाला दरवेळेस पिकांच्या उत्पन्नातून निघणाऱ्या कमाई इतकी नुकसान भरपाई शासन व पाटबंधारे विभागाने द्यावी, ही शेतकऱ्यांची मागणी आहे.