रिक्षातून आले, पैसे दे म्हणाले.., नकार दिला; म्हणून मारहाण करून मोबाईल, लॅपटॉप नेले...
By सागर दुबे | Updated: March 25, 2023 14:39 IST2023-03-25T14:37:33+5:302023-03-25T14:39:15+5:30
तरूण गंभीर जखमी ; गोलाणी मार्केटमधील घटना

रिक्षातून आले, पैसे दे म्हणाले.., नकार दिला; म्हणून मारहाण करून मोबाईल, लॅपटॉप नेले...
लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : दुकानाता कॉम्प्युटरचे सामान ठेवण्यासाठी जात असताना कैजाद नवरोज जलगांववाला (३६, रा.नवीपेठ) या तरूणाला रिक्षातून आलेल्या तिघांनी पैशांची मागणी केली. पैसे नाहीत, केवळ १० रूपये आहे, असे सांगितल्यावर तिघांनी तरूणाला बेदम मारहाण करून त्याच्याजवळील १३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल व ४० हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप हिसकावून नेल्याची घटना गुरूवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केट येथे घडली. याप्रकरणी शुक्रवारी उशिरा शहर पोलिसात गुन्हयाची नोंद झाली आहे.
नवी पेठेतील कैजाद जलगांववाला यांचे गोलाणी मार्केट येथे जे.जे.पॅरामॅडीकी ॲण्ड नरसिंग इन्स्टीटयूट नावाचे दुकान आहे. गुरूवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कैजाद हे दुकानात कॉम्प्युटरचे सामान ठेवण्यासाठी आले होते. रस्त्यात त्यांना रिक्षामधून आलेल्या तिघांनी थांबवून पैशांची मागणी केली. खिशात केवळ १० रूपये आहे, असे सांगितल्यावर तिघांनी त्यांना गालावर व डोळयावर लाथा-बुक्कयांनी मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर एकाने त्यांच्या खिशातून मोबाईल काढला तर एकाने बॅगेतील लॅपटॉप बळजबरीने काढून घेतला. पुन्हा कैजाद यांना मारहाण करून तिघांनी रिक्षातून पळ काढला.
पायावरून नेली रिक्षा...
कैजाद हे जखमी असवस्थेत असताना चोरटयांनी रिक्षा भरधाव चालवून त्यांच्या पायाच्या पंजावरून नेली. त्यामुळे त्यांना पायाला सुध्दा दुखापत झाली. अखेर शुक्रवारी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"