‘मलनिस्सारण’ च्या जलशुध्दीकरण प्रकल्पाला जागाच मिळेना!डिपीआरही लांबला
By सुनील पाटील | Updated: April 20, 2023 18:20 IST2023-04-20T18:20:11+5:302023-04-20T18:20:28+5:30
प्रशासनाचे मोठ्या प्रकल्पाचा खेळखंडोबा करुन ठेवल्याची टिका भाजप नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी केली आहे.

‘मलनिस्सारण’ च्या जलशुध्दीकरण प्रकल्पाला जागाच मिळेना!डिपीआरही लांबला
जळगाव: अमृत २.० प्रकल्पाला अडथळ्यांची मालिकाच सुरु झाली आहे. सविस्तर प्रकल्प अहवालासाठी नवी मुंबईच्या एजन्सीने मनपाच्या अटीशर्ती मान्य नसल्याचे सांगून काम करण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे याच योजनेअंतर्गंत मलनिस्सारण योजनेच्या जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी अजूनही जागा मिळत नाही. गेल्या सहा महिन्यापासून महापालिका जागेचा शोध घेत आहे. प्रशासनाचे मोठ्या प्रकल्पाचा खेळखंडोबा करुन ठेवल्याची टिका भाजप नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी केली आहे.
शासनाने जळगाव शहरात अमृत योजना मंजूर केली आहे. पहिल्या टप्प्यासाठी २५२ कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला. त्यातील २१६ कोटी ७८ लाख रुपये खर्च झालेले आहेत. यात ९२ टक्के काम पूर्ण झालेले आहेत. दुसऱ्या टप्प्यासाठी १२०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. या टप्प्याचा डीपीआर बनविण्याचे काम कोणाला द्यावे, यावरुन बऱ्याच दिवसापासून दोन यंत्रणांमध्ये वादंग निर्माण झाले. नवी मुंबई येथील शहा कन्सलटन्सी या एजन्सीला काम देण्याचा ठराव महापालिकेने गेल्या महासभेत केला. मात्र त्या एजन्सीने काम करण्यास नकार दिला. अमृत २.० मध्ये होणाऱ्या मलनिस्सारण योजनेच्या प्रकल्पासाठी दोन ठिकाणी जागांची आवश्यकता आहे. त्या जागा अद्यापही महापालिका प्रशासनाकडून निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. गेल्या सहा महिन्यापासून मनपा प्रशासनाकडून जागांचा शोध सुरु आहे, परंतु तरीही जागा निश्चित न झाल्यामुळे जलशुध्दकरण प्रकल्पाच्या कामाला ब्रेक लागला आहे. आधीच डीपीआर कोणाला द्यावा यात ८ महिने वाया गेले. आता पुन्हा जागा शोधण्यात मनपाकडून चालढकल होत आहे.