शिक्षिका असलेल्या जळगावच्या महापौरही संपावर, मनपा कर्मचारी मात्र कामावर
By सुनील पाटील | Updated: March 14, 2023 23:38 IST2023-03-14T23:37:46+5:302023-03-14T23:38:03+5:30
महापालिकेतील एकही कर्मचारी मंगळवारी संपात सामील झाला नाही

शिक्षिका असलेल्या जळगावच्या महापौरही संपावर, मनपा कर्मचारी मात्र कामावर
सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर जयश्री महाजन या देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसोबत संपावर गेलेल्या आहेत. त्या महापौर म्हणून नाही तर शिक्षिका म्हणून संपात सहभागी झालेल्या आहेत. दुसरीकडे महापालिकेतील एकही कर्मचारी मंगळवारी संपात सामील झालेला नव्हता. सर्व कर्मचारी कामावर होते.
जयश्री महाजन या मेहरुणमधील एमडीएस कॉलनीतील राज माध्यमिक विद्यालयात शिक्षिका म्हणूनही कार्यरत आहेत. २००५ या वर्षी त्या शाळेत नोकरीत रुजू झाल्या. याच वर्षापासून शासनाने पेन्शन योजना बंद केली. आता याच जुन्या पेन्शनसाठी राज्यभरातील सर्व शासकीय कर्मचारी संपावर उतरले आहेत. शिक्षिका म्हणून शासन आपल्यावरही अन्याय करीत आहे. इतर कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे, तीच आपली आहे. महापौर या नात्याने देखील आपला संपाला पाठिंबा असल्याचे जयश्री महाजन यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
दरम्यान, महापालिकेचा एकही कर्मचारी संपात सहभागी झालेला नाही. मंगळवारी सर्व कर्मचारी नियमित कामावर होते. याबाबतची माहिती शासनाला कळविण्यात आल्याचे आस्थापना प्रमुख लक्ष्मण सपकाळे यांनी सांगितले.