अंगावर वीज पडून युवती जागीच ठार
By संजय पाटील | Updated: March 19, 2023 21:02 IST2023-03-19T21:01:46+5:302023-03-19T21:02:44+5:30
घटना रविवारी सायंकाळी घडली

अंगावर वीज पडून युवती जागीच ठार
संजय पाटील/ अमळनेर (जि. जळगाव): अंगावर वीज पडून शेतमजूर युवती ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी नगाव खुर्द ता. अमळनेर येथे घडली.
निरगली मुका पावरा (१७) असे या ठार झालेल्या युवतीचे नाव आहे. नगाव खुर्द येथे परराज्यातून कुटुंबासह आलेली निरगली ही रविवारी शेतात मजुरीने गेली होती. रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह वादळाला सुरुवात झाली. त्यामुळे मजूर महिला गावाकडे परतत होत्या. त्याचवेळी मागे राहिलेल्या निरगलीवर वीज कोसळली. त्यात ती जागीच ठार झाली.
नगाव येथील मंडळाधिकारी पी.एस. पाटील, तलाठी वाय.आर. पाटील, बळीराम काळे, पोलिस पाटील, प्रवीण गोसावी यांनी पंचनामा केला. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. याबाबत पोलिसात नोंद करण्यात आली आहे.