खान्देशात प्रथमच आढळला ‘कॅस्पियन टर्न’ पक्षी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 02:36 PM2022-04-27T14:36:50+5:302022-04-27T14:37:33+5:30

जिल्ह्यात पक्ष्यांच्या दृष्टीने हतनूर इतकेच वाघूर धरणाचे देखील महत्त्व अधोरेखित होत आहे. स्थानिक पक्ष्यांबरोबरच परदेशी पक्षी देखील त्यांच्या येण्याच्या आणि जाण्याच्या कालावधीत वाघूर जलाशयावर हमखास हजेरी लावतात.

The first Caspian tern was found in Khandesh | खान्देशात प्रथमच आढळला ‘कॅस्पियन टर्न’ पक्षी

खान्देशात प्रथमच आढळला ‘कॅस्पियन टर्न’ पक्षी

Next

जळगाव : जिल्ह्यातील वाघूर धरणातील जलाशयात ‘कॅस्पियन टर्न’ या दुर्मीळ पक्ष्याची खान्देशात पहिल्यांदाच नोंद झाली आहे. पक्षी अभ्यासक राहुल सोनवणे व प्रसाद सोनवणे यांनी ही नोंद केली आहे. आतापर्यंत या पक्ष्याच्या इतर जातींची नोंद खान्देशात झाली आहे. मात्र, ‘कॅस्पियन टर्न’ या पक्ष्यांची खान्देशात झालेली नोंद महत्त्वाची मानली जात आहे.

जिल्ह्यात पक्ष्यांच्या दृष्टीने हतनूर इतकेच वाघूर धरणाचे देखील महत्त्व अधोरेखित होत आहे. स्थानिक पक्ष्यांबरोबरच परदेशी पक्षी देखील त्यांच्या येण्याच्या आणि जाण्याच्या कालावधीत वाघूर जलाशयावर हमखास हजेरी लावतात. वाघूर धरण परिसरात पक्षी निरीक्षण करत असताना राहुल सोनवणे व प्रसाद सोनवणे यांना हा पक्षी आढळून आला. या पक्षी निरीक्षणात मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, अमन गुजर, योगेश गालफाडे, सतीश कांबळे, नीलेश ढाके, जगदीश बैरागी, ऋषी राजपूत, अरुण सपकाळे, वासुदेव वाढे, राजेश सोनवणे यांनी सहभाग नोंदविला.

‘कॅस्पियन टर्न’ या पक्ष्याची काय आहेत वैशिष्टे?
१. हा पक्षी आपल्या भागात आढळणाऱ्या सुरय पक्षांपैकी सर्वात मोठा सुरय असून, याचा आकार ४७ ते ५४ सेमी एवढा असतो. मुख्यत्वे पांढरा रंग असून, याचे पाय आणि डोके काळे असतात. चोच मोठी, जाड असून लाल रंगाची असते. म्हणून याला लाल चोचीचा सुरय हे मराठी नाव आहे.
२. प्रामुख्याने गुजरात व त्यापासून दक्षिणी भागातील समुद्री किनारी, खाडी या भागात हिवाळी स्थलांतर करतो. आपल्या भागातील याची ही नोंद त्याच्या हिवाळी अधिवासाकडून त्याच्या प्रजनन स्थळाकडील मार्गाकडे होणाऱ्या प्रवासादरम्यानचा एक थांबा, अशी असण्याची शक्यता आहे.

जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे विविध स्थलांतरित पक्षी जिल्ह्यातील वेगवेगळ्या जलाशयांचा, जंगलांचा स्थलांतरासाठी वापर करतात, असे आमच्या वन्यजीव संरक्षण संस्थेच्या अभ्यासादरम्यान निदर्शनास आले आहे. जोडी किंवा छोट्या थव्यात आढळणारा हा पक्षी वाघूर धरण परिसरात एकट्यानेच आढळलला.
- राहुल सोनवणे, पक्षी अभ्यासक

मार्च-एप्रिल महिना हा पक्षी निरीक्षक, संशोधक व अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाचा कालावधी असतो. या काळात अनेक जातींचे चिखलपायटे, पाणपक्षी आपल्या हिवाळी निवाऱ्याकडून त्यांच्या मूळ स्थानाकडे परतत असतात. त्यामुळे या परतीच्या मार्गावरील पक्ष्यांच्या नोंदी घेण्याची महत्त्वपूर्ण संधी पक्षी निरीक्षकांना या काळात प्राप्त होते.
- प्रसाद सोनवणे, पक्षी अभ्यासक

Web Title: The first Caspian tern was found in Khandesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव