एलबीटी कार्यशाळेकडे व्यापार्यांनी फिरविली पाठ
By Admin | Updated: May 19, 2014 01:54 IST2014-05-19T01:54:14+5:302014-05-19T01:54:14+5:30
आयोजित करण्यात आलेल्या एलबीटीच्या कार्यशाळेकडे व्यापार्यांनी पाठ फिरविली.

एलबीटी कार्यशाळेकडे व्यापार्यांनी फिरविली पाठ
धुळे : महापालिकेतर्फे छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या एलबीटीच्या कार्यशाळेकडे व्यापार्यांनी पाठ फिरविली. या कार्यशाळेला केवळ २५ ते ३० व्यापारी उपस्थित होते. महापालिकेतर्फे ६ जुलै २०१३ पासून जकात बंद करून एलबीटी हा कर लागू करण्यात आला आहे. या करांतर्गत शहरातील ६ हजार व्यापार्यांची नोंदणी मनपाच्या एलबीटी विभागाने केली आहे. आर्थिक वर्षानंतर व्यापार्यांनी झालेल्या व्यवहाराचे रिटर्न मनपाकडे सादर करणे बंधनकारक आहे. व्यापार्यांनी ९० दिवसांच्या आत रिटर्न दाखल करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. परंतु एलबीटी दाखल झाल्यानंतर प्रथम वर्ष असल्याने व्यापार्यांना रिटर्न दाखल करण्याच्या अडचणी येत असल्याचे सांगितले जाते. यासाठी मनपातर्फे रविवारी व्यापार्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सेवानिवृत्त सह. विक्रीकर आयुक्त सुधीर एम. खैरनार यांनी मार्गदर्शन केले. या वेळी आयुक्त दौलत पठाण, महापौर जयश्री अहिरराव, एलबीटी विभागाचे अधीक्षक किशोर सुडके आदी उपस्थित होते. शहरात सहा हजार व्यापार्यांची नोंदणी झाली असल्याने किमान ५० टक्के तरी व्यापारी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. परंतु केवळ २५ ते ३० व्यापारी या कार्यशाळेला उपस्थित होते. दरम्यान, ही कार्यशाळा झाल्यानंतर व्यापार्यांसाठी प्रत्यक्ष रिटर्न दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. यासाठी संपूर्ण नोंदणी असणे आवश्यक असल्याचे या वेळी सांगण्यात आले.